चौके – प्रतिनिधी मालवण तालुक्यातील पेंडूर गावची सुकन्या कु. सेजल सतीश आळवे हिने पुणे येथील नामांकित एसएनडीटी महिला विद्यापीठ येथून फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल (Food Science and Quality Control) या विषयात पदवी प्राप्त केली आहे. या परीक्षेत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.
सेजल हिने तिचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे पूर्ण केले. इयत्ता दहावी एस एस सी परीक्षेत तिने पेंडूर हायस्कूल मध्येही प्रथम क्रमांक मिळविला होता.
इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान विषयात ती 100 पैकी 100 गुण मिळवणारी पेंडूर हायस्कूल मधील पहिलीच विद्यार्थिनी ठरली होती. याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले होते. यानंतर तिने आपले उच्च माध्यमिक (12 वी – विज्ञान) चे शिक्षण कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळ येथून पूर्ण केले. तिथेही तिने विज्ञान विभागात विशेष प्राविण्य प्राप्त केले होते.
सध्या ती मुंबई येथे याच विषयातील पदव्युत्तर (M.Sc.) शिक्षण घेत आहे.
सेजल हिचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचे तिला मिळालेले सहकार्य अतिशय मोलाचे आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण पेंडूर गावातून तिचे कौतुक केले जात आहे.












