आजारी मुलीच्या भवितव्याच्या चिंतेत आईचा टोकाचा निर्णय
पोलिसांनी आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा दाबून तिचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. जन्मापासून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मुलीच्या भवितव्याबाबत आई प्रचंड मानसिक तणावात होती. पती घरी आल्यानंतर दोघीही मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे : वारजे माळवाडी येथील गोकुळनगर पाथर परिसरात एका 30 वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी महिलेच्या पतीने, जो इलेक्ट्रिशियन असून वय 30 वर्षे आहे, रात्री उशिरा वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, संबंधित मुलीला जन्मापासूनच गंभीर आरोग्याच्या समस्या होत्या. तिची हाडे अत्यंत नाजूक असल्याने किरकोळ पडल्यानेही वारंवार फ्रॅक्चर होत होते. मुलगी अतिशय कमकुवत होती आणि तिला दररोज वैद्यकीय तपासणीची आवश्यकता होती.
मुलीच्या ढासळत्या आरोग्यामुळे आणि अनिश्चित भवितव्यामुळे आई सतत चिंतेत होती. आपण यापुढे नसल्यास मुलीचे काय होईल अशी भीती तिला वाटत होती, असेही काईंगडे यांनी सांगितले. याच मानसिक तणावातून महिलेने मुलीचे हात चिकट टेपने बांधले, पाळणाजवळ दोरीने गळा दाबला आणि त्यानंतर साडीच्या साहाय्याने स्वतः गळफास घेतला.
संध्याकाळी घरी परतल्यानंतर पतीला पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत आणि मुलगी गळ्यात दोरी असलेल्या अवस्थेत आढळून आली, असे पोलिसांनी सांगितले. हे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.











