१९७४ मधील लूटप्रकरणाचा निकाल
पुराव्याअभावी फरार आरोपीची निर्दोष मुक्तता
पुण्यातील तब्बल ५१ वर्षे प्रलंबित असलेल्या एका लूटप्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. १९७४ च्या बॉक्सिंग डेच्या आसपास घडलेल्या प्रकरणात मनगट घड्याळ, थोडी रोख रक्कम आणि रुमाल लुटल्याचा आरोप होता. साक्षीदार आणि ठोस पुरावे उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने फरार आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे न्यायालयीन यंत्रणेचा वेळ वाचवण्यावर भर देण्यात आला. बॉक्सिंग डे हा दिवस या आरोपीसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरला.
पुणे : १९७४ सालच्या एका लहानशा लूटप्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीसाठी बॉक्सिंग डे अखेर आशीर्वाद ठरला. ६० रुपये किमतीचे मनगट घड्याळ, ४ रुपये रोख आणि रुमाल लुटल्याचा आरोप असलेल्या राजाराम तुकाराम काळे यांची ५१ वर्षांनंतर पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
रेल्वे न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. जे. चव्हाण यांनी २६ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले की, फिर्यादी पक्ष आजपर्यंत एकही साक्षीदार न्यायालयात हजर करू शकला नाही. त्यामुळे आरोपीविरुद्ध कोणताही तोंडी किंवा कागदोपत्री पुरावा नोंदवला गेला नाही. अशा परिस्थितीत खटला अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
ही घटना १४ मार्च १९७४ रोजी बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्या वेळी भारतीय दंड संहितेच्या कलम ३९४ अंतर्गत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दोघांनी गुन्हा कबूल केला आणि एप्रिल १९७५ मध्ये तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगली.
तिसरा आरोपी राजाराम काळे, त्या वेळी २० वर्षांचा होता. त्याने गुन्हा कबूल न करता ३ एप्रिल १९७५ रोजी आरोप निश्चित झाल्यानंतर फरार झाला. त्यानंतर अजामीनपात्र वॉरंट आणि घोषणापत्र जारी करण्यात आले, मात्र तो कधीच सापडला नाही. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ प्रकरण निष्क्रिय अवस्थेत राहिले.
सहाय्यक सरकारी वकील अश्विनी काळे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, नवीन न्यायाधीशांनी जुनी व निष्क्रिय प्रकरणे पुनरावलोकनासाठी घेतल्यानंतर ही फाईल पुन्हा उघडण्यात आली. मात्र, तक्रारदार आणि साक्षीदार न्यायालयात हजर न झाल्याने खटल्याला पुढे नेणे अशक्य झाले.
अखेर CrPC कलम २४८(१) अंतर्गत आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने सर्व वॉरंट व बाँड रद्द करण्याचे आदेश दिले असून, जप्त मालमत्ता असल्यास कायद्यानुसार निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. बॉक्सिंग डे, जो दान व मदतीशी जोडला जातो, तो दिवस या प्रकरणात न्यायिक दिलास्याचे प्रतीक ठरला.










