“शिका व पुढे जा” हा यशाचा मूलभूत मंत्र आहे : माजी आमदार श्री. शंकर कांबळी

आरवली-टांक विद्यालयाचे पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

वेंगुर्ले : दाजी नाईक : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या कला गुणांनाही वाव द्यावा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकल पाहिजे. “शिका व पुढे जा” हा यशाचा मूलभूत मंत्र आहे असे प्रतिपादन गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. शंकर कांबळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. आरवली-टांक येथील श्री. सरस्वती विद्यालय स्नेहसंमेलन सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून श्री. कांबळी बोलत होते.
विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हा सोहळा केवळ एक शैक्षणिक कार्यक्रम न राहता, तो विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आणि सुसंस्कारांचा एक अविस्मरणीय जागर ठरला.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नाईक यांनी सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले आणि आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. ​याप्रसंगी व्यासपिठावर गोवा पोलीस सब इन्स्पेक्टर विजय नाईक, बांबोळी मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. उदय साळगावकर, पेडणे येथील असिस्टंट सब इन्स्पेक्टर रामा बुधाजी परब, निवृत्त शिक्षक बागलकर सर, संस्थेचे सह सचिव दिनकर नागवेकर, पदाधिकारी मनमोहन महाले, शिक्षक प्रतिनिधी श्रीराम दीक्षित, सरपंच शेखर कुडव, निवृत्त शिक्षक व पत्रकार सिताराम धुरी, ग्रा.पं. सदस्य समृद्धी कुडव, माजी विद्यार्थी श्री प्रभाकर कावळे, माजी लिपिक प्रमोद खांडेकर तसेच गुरुवर्य अ.वि. बावडेकर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती नीलिमा कांबळे मॅडम, श्री माऊली विद्यामंदिर (रेडी) चे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर जाधव, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र मोंडकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मौलिक विचारांतून विद्यार्थ्यांना पुढील दिशा दिली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘हस्तलिखिताचे’ अनावरण डॉ. उदय साळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सर्व मुलांनी आपले कलागुण सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. ‘पाशुपत श्रीराम दर्शन’ हे दशावतारी नाटक विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सूत्रसंचालन देवयानी झोरे मॅडम यांनी तर आभार निकिता साळगावकर मॅडम यांनी मानले.