आंबोलीच्या ग्रेटा कर्पेला राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेत सुवर्णपदक

​आंबोली : छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेत ग्रेटा महेश कर्पे हिने सुवर्णपदक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले. ग्रेटा ही मूळची आंबोली (बाजारवाडी) येथील असून सध्या सांगली येथे वास्तव्यास आहे. तिच्या या यशामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​ही स्पर्धा शस्त्रांग मार्शल आर्टस महाराष्ट्र राज्य संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन राज्य संघटना प्रमुख मिलिंद काटमोरे यांनी केले होते. ग्रेटाने ‘एअर शिल्ड गर्ल्स’ गटात आपली कौशल्याची चुणूक दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.

​ग्रेटा सांगली येथील जिद्द स्पोर्टस फाऊंडेशनची खेळाडू आहे. तिला सांगली जिल्हा अध्यक्षा काजल लोंढे, सचिव प्रथमेश लोंढे, ग्रामीण सचिव पारस माने, तासगाव तालुका प्रमुख शुभम लांडगे, शितल पारसे, सुशांत दुधाळ, श्रेया कदम आणि सुजाता दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे वडील महेश कर्पे व आई स्वाती कर्पे यांचे तिला मोलाचे प्रोत्साहन मिळाले. ग्रेटाच्या या यशाबद्दल आंबोली ग्रामस्थांसह विविध स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.