सावंतवाडी: पतंजली योग समिती, सिंधुदुर्गच्या वतीने न्हावेली पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ११ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत पाच दिवशीय मोफत संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर न्हावेली – सोनुर्ली तिठा येथील ‘सदगुरू हॉल’ (मोर्ये सर निवास ) येथे दररोज सकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, वजन नियंत्रण आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी योगाचे महत्त्व मोठे आहे. या शिबिरात तज्ज्ञांकडून योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच अधिकृत योगशिक्षक होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही यावेळी करण्यात येईल.
हे शिबिर लहान मुले, युवक, महिला आणि पुरुषांसाठी खुले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागी होणाऱ्यांनी सोबत योगा मॅट किंवा चटई, हातरुमाल व पाण्याची बाटली सोबत आणावी. नाव नोंदणीसाठी श्री. मोर्ये सर (९७६३५१५६९५), योगेश येरम (९४२१२६८८३०) किंवा विद्याधर पाटणकर (९४०४१६९८५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.













