वेंगुर्ला शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न..
वेंगुर्ले : दाजी नाईक
केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ च्या विद्याथ्र्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अशा वैयक्तिक आणि समुहनृत्याने रसिकांना खिळवून ठेवले. तर ‘अंगारीका महिमा’ या दशावतारी नाट्यप्रयोगाने पुराणाची माहिती करून दिली.
येथील केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. सायंकाळी शाळेच्या मैदानावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्तरोत्तर रंगत आणली. या सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, सदस्य देवेंद्र वेंगुर्लेकर, ॲड.संदिप परब, माजी विद्यार्थी तथा पत्रकार प्रथमेश गुरव यांच्या उपस्थितीत झाला. सांस्कृतिक कार्यक्रम खुले असल्याने नागरिकांनीही उपस्थितीत दर्शवित मुलांचे कौतुक केले. या कार्यक्रमाची सांगता ‘अंगारिका महिमा’ या पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाने झाली. यात तनिष मेस्त्री (सेवक), विघ्नेश पवार(इंद्र), वेदांत नाईक(रावण), गुरूदेव दामले (गुराखी म्हणजेच गणपती, सान्वी रजपूत(शुभदा), सोहम कदम (वीरभद्र), वेद वेंगुर्लेकर (शंकर), समर्थ गिरप(नारद), योगिराज पुराणिक(नंदी) यांनी भूमिका साकारल्या. या नाट्यप्रयोगासाठी कौशल नातू, कुशल दामले, धीरज घाडी, प्रथमेश लियमे यांची रंगभूषा तर सुभाष कांदळकर (हार्मोनिअम), अथर्व मैस्त्री (पखवाज) आणि प्रथमेश लिमये (तालरक्षक) यांची संगीतसाथ लाभली. तसेच भैय्या गुरव, अजित दामले, कौशल नातू, महादेव मेस्त्री यांच्यासह मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि पालक यांचे सहकार्य लाभले.









