आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरात स्वच्छतेची विशेष मोहीम

फुकाचे श्रेय लाटण्याचा कोणी प्रयत्न करू नये : नगरसेविका मेघा गांवकर यांनी केले स्पष्ट

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शिवसेना लोकप्रतिनिधी यांच्या वतीने यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. अशी माहिती नगरसेविका मेघा गावकर यांनी दिली आहे.

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शक सूचना नंतर मालवणच्या स्वच्छतेसाठी ४० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फळी उपलब्ध करून दिली आहे. हे कर्मचारी सध्या पूर्ण क्षमतेने शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता करत असून शहराचे रूप पालटताना दिसत आहे.
२१ तारखेला नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी तातडीने मार्केट परिसराची पाहणी केली. व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कचरा गाडीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही गाडी आता दररोज नियमितपणे कचरा संकलित करत असून नागरिकांना त्याबाबत पूर्वसूचनाही देण्यात आली आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय अन्य कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये.

शहरात स्वच्छता मोहीम जोरात सुरू असताना सर्वत्र चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र काही ठिकाणी कचरा गाडी गेल्यानंतर ही रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण होत असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. अस्वच्छता करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जर कोणी मुद्दाम कचरा फेकत आहेत, त्यांच्यावर प्रशासन सक्त कारवाई आणि दंड आकारणार आहे असे नगरसेविका गावकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणी कचरा गाडी गेल्यानंतर उघड्यावर कचरा फेकताना आढळल्यास त्या व्यक्तीचे किंवा त्यांच्या गाडीचे फोटो काढून प्रशासनाकडे पाठवावेत. दोषींवर कारवाई केली जाईल.