विद्युत खांब पडले : वाहिन्या तुटल्या : बत्ती गुल
पुराचा तडाखा : जनावरांचाही मृत्यू
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात तब्बल पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरीही पडझडीच्या मोठ्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर विद्युत खांब पडल्याने विद्युतवाहिन्याही तुटल्या असल्याने अनेक भागांत महावितरणची बत्ती गुल झाली आहे. एकंदरीतच पावसाच्या थेमानामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शनिवारी शेर्ले येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या ठिकाणचे पंचनामे त्वरित केले जावेत अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या. तसेच गावागावात तलाठी व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या भागातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गेले चार दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी तालुक्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या. आंबोली येथे अतिवृष्टीमुळे जानू पटकारे यांच्या गुरांच्या गोठ्याची भिंत कोसळली. यात गोठ्याचे नुकसान होऊन त्यातील एक गायीच्या वासराचा जागीच मृत्यू झाला. पशुधन विभागाकडून याचा पंचनामा करण्यात आला असून गोठ्याचे सुमारे वीस हजार रुपयांचे तर गाईच्या वासराचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तर आंबोली येथील शाहू नवलू झोरे यांची म्हैस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. त्याचाही पंचनामा प्रशासनातर्फे करण्यात आला असून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे गोणसाठवाडी शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले. तर सातार्डा जाधववाडी येथे भले मोठे चिंचेचे झाड उन्हाळून पडल्यामुळे विजेचे खांब तुटून पडले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.

मळगांव गोसावीवाडी येथील विठ्ठल मंदिर लगत असलेल्या धर्मशाळेवर लगत असलेला प्राचीन पिंपळ वृक्ष कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तर बाजूलाच असलेल्या विद्युत वाहिन्यावर देखील झाडाचा काही भाग पडल्यामुळे विजेचे खांब तुटले. त्यामुळे दिवसभर या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असल्यामुळे खाजगी ठेकेदारांकरवी महावितरण कडून कामे करून घेतली जात असली तरीही पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे ही कामे पूर्ण करण्यात अडथळा येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिक ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आपत्तीच्या काळात महावितरणने कर्मचारी वाढवावेत अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बांदा शेर्ले यासारख्या तेरेखोल नदी लागत असलेल्या सखल भागातील गावांमध्ये नदीचे पाणी शिरून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अरुण दा लगत असलेल्या गुरुद्वारे गावात देखील केले चार दिवस शेती व बागायती पूर्णपणे पाण्याखाली आली असल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शेर्ले येथील नुकसानग्रस्त भागाची शनिवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, पोलीस पाटील विश्राम जाधव व शेर्ले ग्रामसेवक नाईक भाऊ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.











