मसुरे | झुंजार पेडणेकर : सांगली जिल्ह्यात मूळ गाव असलेल्या व सध्या देवगड तालुक्यातील हिंदळे येथे स्थाईक झालेल्या संभाजी जकाप्पा माने याची भारत सरकारच्या ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली आहे. देवगड येथील केळकर कॉलेज मधून बीएससी ला प्रथम वर्ष मध्ये शिक्षण घेत असलेल्या व एनसीसी कँडेट असलेल्या संभाजी याची तांत्रिक विभागात निवड झाली आहे.
मोलमजुरी निमित्त त्याचे आई वडील मागील दहा वर्ष हिंदळे येथे स्थाईक झाले आहेत. दोन बहिणी व आई वडील असा त्याचा परिवार आहे.
अग्निवीर भरतीसाठी सर्व तयारी ही पूर्णपणे वैयक्तिक केलेली असून लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन तासिका व मॉक टेस्टचा सराव उपयोगी आला असे तो म्हणाला. सातारा येथे पार पडलेल्या मैदानी परीक्षेसाठी शारीरिक रित्या तंदुरुस्त राहणे व धावण्याचा सराव भरपूर केल्याचे त्याने सांगितले.
या यशा मागे पालकांचे आशीर्वाद, कॉलेज मधील शिक्षकांचे मार्गदर्शन व हिंदळे येथील कुलकर्णी परिवाराची मदत याचा खूप मोठा वाटा आहे असे त्याने सांगितले. प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या त्याच्या यशा बद्दल हिंदळे सरपंच मकरंद शिंदे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.











