कट्टा येथे ‘वेध भविष्याचा’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे आयोजित “वेध भविष्याचा” या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य माहिती, अभ्यासाची दिशा व करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय मोरे उपस्थित होते. त्यांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, एमपीएससी, यूपीएससी, बँक, एसएससी, संरक्षण दल आदी परीक्षांची रचना, अभ्यासाचे तंत्र, वेळेचे नियोजन तसेच सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आपल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. “ध्येय निश्चित करून योग्य नियोजन व सातत्य ठेवले, तर यश निश्चित आहे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास श्री. देविदास पवार, TIFR (इस्रो) येथे इंजिनीयर म्हणून निवृत्त झालेले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना शिस्त, कष्ट आणि देशसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. सुरेश जाधव, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे ट्रस्टी, तसेच
श्री. प्रवीण शेवडे, म्युझिक थेरपिस्ट तसेच इंग्रजी विषयाचे अभ्यासक, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. शैक्षणिक यशासोबत मानसिक स्वास्थ्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचा समतोल साधणे आजच्या काळात किती आवश्यक आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल दीपक भोगटे यांचे सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष आभार मानले.
या वेळी वराडकर हायस्कूलचे प्राचार्य देवयानी गावडे आपल्या मनोगतात म्हणाल्या , “अशा मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते तसेच करिअरच्या विविध संधींबाबत त्यांची दृष्टी व्यापक होते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
प्रवीण परुळेकर सर यांनी केले
कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेच मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.