सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयनेच्या जंगलात ‘बाजी’ वाघाची डरकाळी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून तीन नर वाघांचा वावर असून STR T1, T2 आणि T3 यांनी आपापली हद्द निश्चित केली आहे. यामध्ये STR T1 आणि STR T2 हे ‘सेनापती’ व ‘सुभेदार’ प्रामुख्याने चांदोली परिसरात फिरत असताना, कोयना भागात STR T3 म्हणजेच ‘बाजी’ या नर वाघाने आपले स्वतंत्र हद्द क्षेत्र निश्चित केले आहे.

बाजी हा नर वाघ भैरवगड ते पाली आणि मालदेव परिसरापर्यंत मुक्त संचार करत असून कोयना जंगलात नियमितपणे शिकार करताना दिसत आहे. कोयना भागातील काही कॅमेरा ट्रॅपमध्ये अलीकडेच बाजीचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत. या वाघाच्या पायाच्या पंज्याचा आकार साधारण १६ बाय १६ सेंटीमीटर इतका असून तो पूर्ण वाढलेला, अंदाजे ३ ते ३.५ वर्षांचा मोठा नर वाघ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, नुकतेच राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फेज १ अखिल भारतीय व्याघ्र गणना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पार पडली. १२ ते १७ जानेवारी या कालावधीत झालेल्या या सर्वेक्षणासाठी देशभरातील विविध राज्यांतून सुमारे ७५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. केरळ, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्वयंसेवकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला.

सर्वेक्षणादरम्यान विविध कॅमेरा ट्रॅपमधून वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या हालचालींची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे या काळात कोयना भागातील पाली आणि जुगंटी परिसरात काही स्वयंसेवकांना बाजी वाघाच्या जोरदार डरकाळ्या ऐकायला मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, नुकतेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीणी सह्याद्रीमध्ये सोडण्यात आल्या आहेत. भविष्यात मादी वाघांच्या उपस्थितीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची वंशवृद्धी होण्याची शक्यता असून, त्यातून वन पर्यटनाला चालना मिळेल. परिणामी, स्थानिक पातळीवर वन पर्यटनाशी संबंधित नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सोबत, बाजी या नर वाघाचे कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेले फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध झाले आहेत.