डंपर चोरी प्रकरणातील फरार संशयित आरोपी पुण्यातून जेरबंद

​संशयिताला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

सावंतवाडी : मळगाव येथून मार्च २०२४ मध्ये झालेल्या डंपर चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धनाजी नागनाथ लोकरे (वय ३५, रा. लवुळ, ता. माढा, जि. सोलापूर) याला सावंतवाडी पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता २० जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
​मळगाव येथील डंपर चोरीबाबत सालईवाडा येथील अभिषेक सावंत यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी सुनील कोळेकर याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत सोलापूर परिसरातील अन्य तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली होती, मात्र ते फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.
​दरम्यान, संशयित आरोपी धनाजी लोकरे हा पुणे येथे असल्याची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील आणि हवालदार रामदास जाधव यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
​