पुणे विमानतळावर आकासा एअरच्या पुणे–अहमदाबाद फ्लाइटमधील 150 हून अधिक प्रवाशांना तब्बल 11 तास प्रतीक्षा करावी लागल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सतत बदलणारे गेट क्रमांक, उड्डाण वेळेबाबत अपुरी माहिती आणि शेवटी फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती न दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागला. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी अतिरिक्त फ्लाइटने प्रवाशांना अहमदाबादला पाठवण्यात आले.
गेट बदल, उशीर आणि अखेर रद्द
पुणे : अहमदाबादला जाणाऱ्या आकासा एअरच्या QP-1509 या फ्लाइटमधील 150 हून अधिक प्रवाशांना शनिवारी संध्याकाळपासून पुणे विमानतळावर सुमारे 11 तास थांबावे लागले. ही फ्लाइट रात्री 10.10 वाजता पुण्याहून उड्डाण करणार होती आणि 11.45 वाजता अहमदाबादला पोहोचणार होती. मात्र, उड्डाण वेळ वारंवार बदलत गेल्याने प्रवाशांचा गोंधळ वाढत गेला.
वाघोली येथील रहिवासी संजीव पाटील यांनी सांगितले की, विमानतळावर येण्यापूर्वीच त्यांना फ्लाइट उशिरा असल्याचा संदेश मिळाला. प्रत्यक्ष विमानतळावर पोहोचल्यानंतर उड्डाणाची वेळ 11.20, 11.55 अशी बदलत गेली. त्याचबरोबर गेट क्रमांक 5, 7 आणि 9 असे सतत बदलण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बोर्डिंग सुरू न झाल्याने प्रवाशांचा संयम सुटू लागला.
एअरलाइनची भूमिका आणि प्रवाशांचा त्रास
पहाटेच्या सुमारास एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला पार्किंग बे उपलब्ध नसल्याने उशीर झाला. तसेच पायलटचे ड्युटी अवर्स संपल्यामुळे उड्डाण होऊ शकले नाही. अखेर पहाटे 3.30 वाजता फ्लाइट रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. काही प्रवाशांना रिफंडचा पर्याय देण्यात आला, तर इतर फ्लाइटचे भाडे शेवटच्या क्षणी 15 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.
एअरलाइनकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, प्रवाशांना रद्दीकरणाची माहिती 12.30 वाजता देण्यात आली होती. ऑपरेशनल कारणे आणि सुरक्षा नियमांमुळे फ्लाइट पुढे नेता आली नाही, असे स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पुण्याहून निघणाऱ्या अतिरिक्त फ्लाइट QP-6950 ची व्यवस्था करण्यात आली.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सकाळी 5 वाजता अल्पोपाहार देण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेक प्रवासी संतप्त झाले होते. काहींना हॉटेलमध्ये नेण्यात आले, पण तेथेही अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सकाळी 8.45 वाजता प्रवासी फ्लाइटमध्ये बसले आणि उशिरा अहमदाबादला पोहोचले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी प्रहार डिजिटलकडे दिली.











