रत्नागिरी:
रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजाला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. नगर परिषदेच्या प्रशासकीय प्रक्रियेनुसार, विविध विभागांच्या जबाबदाऱ्या अनुभवी सदस्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी श्री. तिवरेकर समीर जगन्नाथ यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम समितीचे नेतृत्व श्री. कीर संतोष दत्तात्रय यांच्याकडे देण्यात आले आहे.
शहरातील पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी श्री. नायर निमेश विजय यांची निवड करण्यात आली असून, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीची जबाबदारी श्री. नागवेकर राकेश चंद्रकांत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी श्री. साखरकर सुहेल अब्दुल लतीफ यांची वर्णी लागली आहे. तसेच, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून श्रीमती सुर्वे प्रिती रविंद्र या कामकाज पाहणार आहेत.
या सर्व नवनियुक्त सभापतींकडून रत्नागिरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











