​सावंतवाडीत पीएनजी गॅस पाईपलाईनचे लोकार्पण

​नगरसेवक अजय गोंदावळे यांच्या निवासस्थानी उद्घाटन

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहराच्या आधुनिकतेत आणि सोयीसुविधांमध्ये आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. शहरातील सर्वोदय नगर, न्यू सालईवाडा परिसरात बहुप्रतीक्षित गॅस पाईपलाईन योजनेचे (PNG) आज बुधवारी सकाळी ११ वाजता उत्साहात उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक अजय वसंत गोंदावळे यांच्या निवासस्थानी गॅस शेगडी प्रज्वलित करून या सेवेचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले.

​शहरातील घरगुती गॅस वापराची पद्धत आता बदलणार असून, सिलिंडरच्या कटकटीतून मुक्तता देणारी ही पाईपलाईन सेवा आता सर्वोदय नगरमधील घराघरांत पोहोचली आहे. या प्रकल्पामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

​ ​या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, नगरसेविका स्नेहा नाईक आणि शर्वरी धारगळकर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

​तसेच सर्वोदय नगर संघ महिला अध्यक्षा दिशा कामत, सौ. बार्देसकर मॅडम, सौ. साटेलकर यांच्यासह परिसरातील अनेक महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​सुविधांचे नवे पर्व
​”शहराचा विकास होत असताना अत्याधुनिक सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. गॅस पाईपलाईनमुळे इंधनाची बचत होईलच, पण सुरक्षितता आणि सुलभताही वाढेल,” असे मत यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित महिलांनी या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करत, आता गॅस संपण्याची भीती किंवा सिलिंडर बुकिंगची प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

​या कार्यक्रमानंतर परिसरातील इतर नागरिकांच्या घरी देखील या सेवेचा विस्तार करण्यात आला. सर्वोदय नगरमधील रहिवाशांनी या सुविधेचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.