कालावलखाडी दरवर्षी तळाशिलचा भुभाग करतये गिळंकृत
आचरा | प्रतिनिधी : एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कालावल खाडी अशा निसर्गाने नटलेल्या तोंडवळी तळाशिल भागात मच्छीमार बांधव आपला पारंपरिक मासेमारी व्यवसाय सांभाळत अन्य उद्योग-व्यवसायात गुंतला असतो मात्र या ग्रामस्थांना आता खाडीच्या बाजूने सुरक्षिततेची गरज निर्माण झाली आहे. पावसाळी हंगामात तळाशिलच्या दोन्ही बाजूला पाण्याचे आक्रमण वाढत जाते. समुद्राच्या आक्रमणाबरोबरच दरवर्षी खाडीलगत सुरक्षित बंधरा नसल्याने मोठ्या प्रमाणात भुभाग ढासळत असून यात माड बागायतीचेही नुकसान होत आहे. तळाशिलवासीयांना भयमुक्त राहण्यासाठी खाडीच्या बाजूने तातडीने सुरक्षित बंधारा बांधण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
खाडीच्या प्रवाहाने होतेय मोठ्या प्रमाणात धूप
एका बाजूने समुद्र आक्रमण करीत असताना दुसऱ्या बाजूने खाडीचा प्रवाह बदलत असून मोठी धूप होत आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांचा विचार करता मोठ्या प्रमाणात फुटाचा भूभाग नष्ट होऊन ते क्षेत्र आता खाडीने व्यापले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर खाडीच्या बाजूला १९९० साली पतन विभागामार्फत बंधारा घालण्यात आला होता. सध्या हा बंधारा असून नसल्यासारखा आहे. बंधारा पूर्ण खचून पाण्याखाली गेला असल्याची माहिती तोंडवळी येथील ग्रामस्थ गणपत शेलटकर, नरेंद्र मेस्त, लक्ष्मण पराडकर, संतोष कांदळकरj यांनी दिली. दोन दिवसापूर्वी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका बाळा पेडणेकर घर ते नरेंद्र मेस्त घर यादरम्यान बसला. बंधारा नसल्याने मोठ्या प्रमाणात खाडीचे पाणी घुसले होते. त्यामुळे काही भूभाग वाहून गेला आहे. अशाच प्रकारे वर्षाकाठी खाडी किनाऱ्याचा सुमारे दीड मीटर रुंदीचा भाग नष्ट होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रशासन, लोकप्रतिनिधी लक्ष कधी घालणार?
खाडी किनाऱ्याला बंधारा घालून खाडीपात्रात पाण्यात तिरके बंधारे बांधल्यास प्रवाहाचा मारा कमी होऊन होणारी धूप थांबून तळाशिल किनाऱ्यास कायमची सुरक्षितता प्राप्त होऊ शकते. ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागाकडे यासाठी ठरावांद्वारे वारंवार मागणी केल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. तळाशिलच्या भुभागच्या होणाऱ्या धूपीमुळे ग्रामस्थांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी, प्रशासन याकडे गांभिर्याने लक्ष देणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे












