सिंधुदुर्गनगरी, : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या एप्रिलच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी २४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ’रंग-संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाटक आणि प्रेक्षक यांचे नाते उलगडणा-या या कार्यक्रमात नाट्यकर्मी, निवेदक निलेश पवार रसिकांशी संवाद साधणार आहेत.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग चौदावा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
मराठी माणसाचे, त्यातही कोकणी माणसाचे नाट्यवेड सर्वश्रुत आहे. तोंडाला रंग फासला नाही, असा मराठी माणूस विरळा. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, व्यवस्थापन, बॅकस्टेज, तालमी असे रंगभूमीचे अनेक आयाम आहेत. नाटक ही सोपी गोष्ट नाही. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, अभिनेते आणि प्रेक्षक यांचे नाते, नाटक या सशक्त माध्यमाची ताकद, नाटक कसे पाहावे, या सगळ्याबाबत युवा अभिनेते, लेखक, निवेदक निलेश पवार या कार्यक्रमात आपणाशी संवाद साधणार आहेत. क्रिकेटपटू असलेले निलेश पवार डबिंग आर्टिस्ट, समालोचक, व्हायोलीन वादक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अनेक दुरचित्रवाणी मालिका, नाटके, एकांकिका यातून त्यांनी भूमिका केल्या आहेत.
हा कार्यक्रम सर्वांना खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.
००००००










