पुणे विमानतळावर बॉम्ब धमकीमुळे इंडिगो विमान तासभर रोखले

दिल्ली–पुणे इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी; तपासणीनंतर फसवी ठरली


दिल्लीहून पुण्यात आलेल्या इंडिगो विमानाला बॉम्बची कथित धमकी मिळाल्यानंतर पुणे विमानतळावर तासाभराहून अधिक काळ थांबवून ठेवण्यात आले. सखोल तपासणीनंतर ही धमकी फसवी असल्याचे निष्पन्न झाले.


पुणे : इंडिगोची दिल्ली–पुणे उड्डाण सेवा 6E 2608 गुरुवारी रात्री पुणे विमानतळावर उतरल्यावर बॉम्ब धमकीची माहिती मिळाली. या विमानात 100 हून अधिक प्रवासी होते.

हे विमान मूळ नियोजित वेळेनुसार रात्री 8.40 वाजता पुण्यात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, दिल्लीहून उड्डाणास उशीर झाल्याने ते रात्री 9.24 वाजता पुणे विमानतळावर उतरले आणि 9.27 वाजता बे क्रमांक 3 येथे पार्क करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील एका वॉशरूममध्ये फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा उल्लेख असलेले पत्र सापडले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने, प्रस्थापित SOPनुसार CISF कडून विमानाची कसून तपासणी करण्यात आली.

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी निवेदनात सांगितले,
“दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2608 ला 22 जानेवारी रोजी बॉम्ब धमकीची माहिती मिळाली होती. एप्रॉन कंट्रोलला तत्काळ याची माहिती देण्यात आली. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान सामान्य ऑपरेशनसाठी सोडण्यात आले. परिस्थिती समन्वयाने आणि वेळेत हाताळण्यात आली व कोणतीही अनुचित घटना घडली नाही.”

दरम्यान, इंडिगो एअरलाइननेही निवेदन जारी करत सांगितले की,
“लँडिंगनंतर लगेचच संभाव्य सुरक्षेचा धोका लक्षात आल्यानंतर, आम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि प्रस्थापित सुरक्षा प्रोटोकॉलनुसार पूर्ण सहकार्य केले.”

सखोल तपासणीनंतर ही धमकी फसवी असल्याचे स्पष्ट झाले. तपास पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना विमानातच थांबवण्यात आले होते.