मालवण- साधारण सन१९८९ चा काळ. त्या काळात ना मोबाईल फोन, ना फेसबुक, ना व्हाटस् ॲप, ना इतर कोणते समाजमाध्यम. त्यामुळे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्या वर्गातला प्रत्येकजण पुढे आपापल्या मार्गाने गेला. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि दहा-बारा वर्षांपुर्वी व्हाटस् ॲपच्या माध्यमातून शोधाशोध करून, एकेकजण जोडून या मित्रमैत्रिणींचा व्हाटस् ॲप गृप तयार झाला. मध्यंतरात ‘कधीतरी एकत्र येऊया रे’ चा विचार पुढे आला आणि तब्बल सदतीस वर्षांनंतर मालवण तालुक्यातील त्रिंबक पंचक्रोशीतील जनता विद्या मंदिर, त्रिंबक या प्रशालेतून सन १९८८-८९ या वर्षी इयत्ता दहावी शिकून बाहेर पडलेल्या मित्रांचे स्नेहसंमेलन आचरे येथील ‘डेफोडिल्स रिसाॅर्ट ‘मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या गृपमधील काही मोजके मित्र मैत्रिणी नेहमी किंवा कधीतरी एकमेकांना भेटत असले तरी अनेकजण मात्र तब्बल सदतीस वर्षांनंतर परस्परांना प्रत्यक्ष भेटले. दरमयानच्या काळात वयानुरुप अनेकांमध्ये शारीरिक बदल झालेले असल्याने आणि चेहरेदेखील बदलले असल्याने अनेकांना एकमेकांना ओळखताना अनपेक्षित धक्के बसले. मात्र इतक्या कालखंडानंतर अशी प्रत्यक्ष भेट सर्वांनाच सुखावून गेली. महत्वाचे म्हणजे या वर्गमित्रांना इयत्ता दहावीपर्यंत अध्यापन केलेले सन्माननीय शिक्षक धोंडी जोशी,उदय मेहेंदळे, गोविंद गांवकर, सदाशिव गवस, सौ.हेमांगी खोत,सौ.अर्चना बागवे,सौ विशाखा सावंत, श्री पवार तसेच तत्कालीन शालेय शिपाई रोहीदास गोसावी, शत्रुघ्न त्रिंबककर,माई हे सुद्धा या स्नेहसंमेलनास आवर्जून उपस्थित राहिले. या स्नेहसंमेलनात परस्पर परिचयाबरोबरच विविध गमतीशीर खेळ, सहभोजन, मनोरंजक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व गुरूजनांची पाद्य पूजा करून जो कार्यक्रम केला त्यात सर्वच शिक्षक आणि विद्यार्थी भावूक झाले.तब्बल सदतीस वर्षांनंतरचा हा पहिला भव्यदिव्य स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी दिनेश त्रिंबककर, संदेश रावले, श्रीकृष्ण पडवळ, अरुणा पवार, दुर्गाप्रसाद ठाकूर, मोतेस फर्नाडिस, संदीप तेली, विनायक त्रिंबककर, संतोष साटम, गंगाधर चिंदरकर, रविंद्र जोईल, संगीता त्रिंबककर, प्रवीण अपराज, प्रशांत मेहेंदळे, जयवंत तावडे आदी अनेक वर्गमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय श्री उदय मेहेंदळे सर होते.कार्यक्रमात काही मोजके विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मनोगतातून आपले विचार प्रकट केले. शेवटी अजय पवार याने आभार मानल्या नंतर सौ.बागवे मॅडम यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









