गोवा पोलिसांसह संयुक्त शोधमोहीम निष्फळ
अज्ञातांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल
सावंतवाडी / पेडणे /प्रतिनिधी : बुधवारी रात्री सावंतवाडी शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गोवा-कळंगुट येथील एका टॅक्सी चालकावर पेडणे, मालपे येथे प्राणघातक हल्ला करून त्याचीच टॅक्सी घेऊन हे चोरटे सावंतवाडीच्या दिशेने पळाले होते. सावंतवाडीत त्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला, दोन मोबाईल चोरले आणि दोन दुचाकी पळवून कणकवलीच्या दिशेने पोबारा केला. गोवा आणि सावंतवाडी पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त शोधमोहिमेनंतरही चोरट्यांना पळून जाण्यात यश मिळाले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरी असे तीन स्वतंत्र गुन्हे अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल करण्यात आले आहेत.
टॅक्सी चालकावर हल्ला, गोवा पोलिसांची धावपळ
कळंगुट येथील एका टॅक्सी चालकाला सावंतवाडीपर्यंतचे भाडे असल्याचे सांगून चोरट्यांनी टॅक्सी बुक केली होती. रात्री उशिरा मालपे, पेडणे येथे त्यांनी चालकावर जीवघेणा हल्ला केला. चालकाला बाहेर ओढून टाकून त्याच टॅक्सीने चोरटे सावंतवाडीच्या दिशेने पळाले. या घटनेची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी तात्काळ संपूर्ण राज्यात नाकाबंदी केली, परंतु चोरटे हाती लागले नाहीत. त्यानंतर गोवा पोलिसांचे एक पथक मोबाईल लोकेशनच्या आधारे चोरट्यांचा माग काढत थेट सावंतवाडीत पोहोचले. मात्र, गोवा पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच चोरट्यांनी ती टॅक्सी कुठे तरी सोडून दिली आणि अज्ञात दिशेने पळ काढला. दरम्यान, मालपे राष्ट्रीय महामार्ग येथे असलेली अर्टिका टुरिस्ट गाडी पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सावंतवाडीत दुचाकी आणि मोबाईल चोरी
टॅक्सी सोडून दिल्यानंतर चोरट्यांनी सावंतवाडी शहरात चोरीचा धुमाकूळ घातला. खासकिलवाडा परिसरातून त्यांनी दोन दुचाकी चोरल्या. यामध्ये शहरातील हेल्थ पार्क परिसरातील मिनल भिरमुळे यांची दुचाकी आणि तेथे झोपलेल्या दोन कामगारांचे मोबाईलचा समावेश आहे. तसेच ज्यूस्तीनगर येथील पॉवलीन रॉड्रिग्स यांची दुचाकीही चोरट्यांनी पळवली. याच दरम्यान, शहरातील जेलनजीकच्या एका बंगल्यात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाती काही लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
संयुक्त शोधमोहीम निष्फळ: कणकवलीत एक दुचाकी सापडली
मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत सावंतवाडी शहरात गोवा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. गोवा पोलिसांच्या तब्बल सहा पोलीस व्हॅन सावंतवाडीत दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत शहरातील विविध परिसरात चोरट्यांचा शोध घेण्यात आला, मात्र चोरट्यांना पोलिसांना गुंगारा देण्यात यश आले. आज सकाळी चोरट्यांनी चोरलेली एक दुचाकी कणकवली, सावडाव येथे आढळून आली आहे, तर दुसऱ्या दुचाकीचा शोध अजूनही सुरू आहे.
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
दरम्यान, घटनेनंतर सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडून चोरीबाबत माहिती घेतली. तसेच चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडे तीन चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर व परिसरात सी सी टिव्ही फुटेजचा तपास
गोवा येथे टॅक्सीचालकावर झालेला हल्ला व सावंतवाडीतील घरफोडी व अन्य चोरीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील खाजगी तसेच शासकीय सीसीटीव्ही फुटेज चा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरीही तांत्रिक तपासानंतर त्यांना ताब्यात घेण्यात नक्कीच यश येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची पोलीस ठाण्यात भेट
सावंतवाडी शहरात झालेली घरपोडी व अन्य चोरींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी रात्री ८.३० च्या सुमारास सावंतवाडी पोलीस ठाण्यात भेट देत माहिती जाणून घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना केल्या.
गोवा मालपे येथे टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला
कळंगुट येथील एका टॅक्सीचालकावर मालपे येथे जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. बांदा येथे भाडे असल्याचे सांगून अज्ञात चौघांनी ही टॅक्सी भाड्याने घेतली होती. वाटेतच त्यांनी टॅक्सीमालक संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी टॅक्सीमालकाने पेडणे पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इर्टिगा गाडी (जीए ०३ डब्ल्यू ४१८०) चोरण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला असावा असा अंदाज आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास मालपे-न्हयबाग रस्त्यावर संशयितांनी वेंगुर्लेकर यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जखमी केले होते. जखमी अवस्थेत पडलेल्या चालकाला पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गोवा पोलिसांची सहा पथके सिंधुदुर्गात पाठवण्यात आली, त्यापैकी तीन ते चार पथके सावंतवाडी शहरात रात्री उशिरापर्यंत गस्त घालत होती.










