सह्याद्री फाऊंडेशनतर्फे २६ जुलै ते १९ ऑगस्ट कालावधीत ‘ मान्सून महोत्सव’

सावंतवाडी । प्रतिनिधी : सह्याद्री फाउंडेशनतर्फे दरवर्षी घेण्यात येणारा मान्सून महोत्सव यावर्षी २६ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधी होणार आहे. हा महोत्सव विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहीती सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब आणि विद्यमान अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी संयुक्तरित्या दिली.
सह्याद्री फाउंडेशनतर्फे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मान्सून महोत्सव घेण्यात येतो. कोरोना महामारीच्या काळात गेली दोन वर्षे मान्सून महोत्सव स्थगित करण्यात आला होता. मात्र, यंदा पुन्हा एकदा सह्याद्री फाउंडेशन आयोजित मान्सून महोत्सव २०२३ भरविण्यात येणार आहे. या महोत्सवा संदर्भात फाउंडेशनची बैठक झाली. या बैठकीत महोत्सवाच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. या महोत्सवा अंतर्गत आरोग्य मंथन, शिक्षण, निबंध स्पर्धा, रानभाज्या स्पर्धा, माता बालसंगोपन, साहित्य वाटप, पर्यावरण व वृक्ष संवर्धन असे विविध उपक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.
यात २६ जुलैला सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांशी संवाद त्यांच्या अडीअडचणी आणि त्यांना फळ वाटप, २७ जुलैला महोत्सव शुभारंभ कार्यक्रम सकाळी ११ वाजता कोलगाव येथील सैनिक पतसंस्थेच्या कार्यालयात होणार आहे तर दुपारी बारा वाजता आपल्या आरोग्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि खाण्याचे नियोजन संदर्भात आरोग्य मंथन या कार्यक्रमा अंतर्गत श्रीमती विनया बाड यांचे मार्गदर्शन, ६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंदमुळे रानभाज्या पावसाळी ऋतूतील भाज्या यांचं प्रदर्शन स्पर्धा, ९ ऑगस्ट बेबी किड्स तर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व सावंतवाडी जानकीबाई सुतिकागृह येथील बालकांना साहित्य वाटप व त्यांच्या आरोग्याची काळजी या संदर्भात माता संगोपन चर्चासत्र, दुपारी बारा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने खुली निबंध स्पर्धा, १८ ऑगस्ट उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप व तेथील डॉक्टरांशी संवाद, १९ ऑगस्ट रोजी अकरा वाजता काझी शहाबुद्दीन हॉल येथे समारोप होणार आहे.यानिमित्ताने शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
तरी या मान्सून महोत्सवात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे सावंतवाडी येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्था येथे माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे यांच्याकडे द्यावीत. तसेच रानभाज्या स्पर्धा उपक्रमासाठी विभावरी सुकी व मोहिनी मडगावकर यांच्याकडे नावे द्यावीत.
या बैठकीत सह्याद्री फाउंडेशनचे कार्यवाहक ॲड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर,माजी सभापती प्रमोद सावंत,माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे,माजी सचिव सुहास सावंत, संदीप सुकी, मोहिनी मडगावकर आधी उपस्थित होते.