वेंगुर्ले : दाजी नाईक
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सेवाकर्मी + पुरस्कार नगरपंचायत/नगर परिषद गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला नगरपरिषदेने १०० पैकी १०० गुण मिळवित राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या या यशामागे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे संयुक्त प्रयत्न आहेत.
वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयात प्रशासनाने आकृतीबंध, सेवा प्रवेश नियमावाली, सर्व संवर्गाची ज्येष्ठता सूची, पदोन्नतीने नियुक्ती, सरळ सेवा नियुक्ती, अनुकंपा नियुक्ती, बिंदू नामावली प्रामाणिकरण, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत अशा सर्वच विभागांचे काम उत्कृष्ट केले आहे. त्यामुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
भविष्यातही नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा निर्धार मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी व्यक्त केला आहे. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी गेल्या सुमारे एक वर्ष कार्यकालात नगरपरिषद व वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी चांगले कार्य केले आहे.
दरम्यान या शासनाच्या कार्यक्रमात वेंगुर्ला नगरपरिषदसह रत्नागिरी, सिल्लोड, उदगीर इत्यादी ४ नगरपरिषदा, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा) इत्यादी महाराष्ट्र राज्यातील एकूण १२ सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनी राज्यस्तरावर या सेवाकर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी यांनी समन्वय साधून काम केल्यास निश्चितच चांगले काम होते. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी मागील वर्षभरात चांगले काम केले असून, यापुढेही यापेक्षाही चांगले काम करावे, असे यावेळी बोलताना नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी स्पष्ट करून नगरपरिषद प्रशासनाचे अभिनंदन व कौतुक केले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.










