कै. अण्णासाहेब कदम यांच्या स्मरणार्थ १.५१ लाख रुपयांची मदत; वर्ग नूतनीकरणाला गती
शिरगाव (प्रतिनिधी) : शाळेतील संस्कारांच्या पायावर उभा राहिलेला विद्यार्थी जेव्हा पुन्हा आपल्या शाळेसाठी काहीतरी देण्याचा विचार करतो, तेव्हा त्या कृतीला एक वेगळीच उंची प्राप्त होते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच शिरगाव हायस्कूल, शिरगाव येथे घडली.
शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी तसेच माजी प्राचार्य श्री. विजयकुमार सखाराम कदम आणि त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया विजयकुमार कदम यांनी कै. अण्णासाहेब (आ. सी.) कदम यांच्या स्मरणार्थ शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी १,५१,००० रुपये इतकी उदार देणगी दिली. या देणगीतून शाळेतील एका वर्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
मंगळवारी हा धनादेश शाळा समितीकडे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आला. यावेळी मुंबई कमिटी सदस्य श्री. अमित साटम, मानद अधीक्षक श्री. संदीप साटम, शाळा समिती सदस्य श्री. दिनेश साटम, श्री. मंगेश लोके, शिक्षक प्रतिनिधी श्री. हेमंत सावंत, ज्येष्ठ शिक्षक श्री. उदयसिंग रावराणे तसेच मुख्याध्यापक एस. एन . आत्तार उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्या व शाळेच्या वतीने श्री. विजयकुमार कदम व सौ. सुप्रिया कदम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
फोटो कॅप्शन :शिरगांव हायस्कूलच्या नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी विजयकुमार कदम यांनी १. ५१ लाख रुपयांचा धनादेश संस्थेला सु्फूर्द केला.










