११ कोटींची फसवणूक; आरोपींचे मोठे जाळे उघड
वेगवेगळ्या राज्यांतून अटक; २.६५ कोटी रुपये गोठवण्यात यश
पिंपरी चिंचवड परिसरातील ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणूक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत नऊ जणांवर मोक्का लावला आहे. या टोळीने एका ५८ वर्षीय माजी संचालकाची तब्बल ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी विविध बँक खात्यांद्वारे पैसे वळवले होते. त्यापैकी २.६५ कोटी रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड : ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. ही सर्व आरोपी एक संघटित टोळीचा भाग असून त्यांनी एका खासगी कंपनीच्या ५८ वर्षीय माजी संचालकाची ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात आरोपींनी फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली होती. त्यातील २.६५ कोटी रुपये गोठवण्यात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर गुन्हे शाखेच्या तपासातून या मोठ्या आर्थिक फसवणुकीचे जाळे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी पुणे, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद तसेच राजस्थानमधील उदयपूर येथून संशयित आरोपींना अटक केली आहे. या आरोपींविरोधात पिंपरी चिंचवड, मुंबई आणि मध्य प्रदेश येथेही ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
सायबर पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक रविकिरण नाळे यांनी या आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आवाड यांनी या टोळीतील सदस्यांवर मोक्का लागू करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कडक उपाययोजना सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.








