सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; जांभुळनगर गावावर शोककळा

दापोली प्रतिनिधी: विषारी सर्पदंशाने जांभुळनगर येथील जयश्री जितेंद्र बर्जे (32) या महिलेचा मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना सोमवार दि. 26 जानेवारी 2026 घडली आहे.
आज प्रजासत्ताक दिन असल्याने व जयश्री ह्या शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष असल्यामुळे आज त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आला होता.

जयश्री बर्जे ह्या शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. जांभुळनगर येथील रहिवासी जयश्री बर्जे या आपल्या घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. साधरणत: संध्याकाळ 4.00 च्या सुमारास त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याचे समजताच त्या तातडीने आपल्या घरी धावत जावुन या घटनेची माहिती दिली. त्यांना घरच्या कुटुबांने व ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच जयश्री बर्जे यांचा मृत्यू झाला झाला होता.

*बर्जे परिवारावर महिन्यात दुसरा आघात*
बर्जे कुटुंबावर एका महिन्यात हा दुसरा आघात आहे. काही दिवसांपूर्वी जयश्री बर्जे यांचे सासरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले होते. गरीब कुटुंब असल्याने जयश्री या देखील शेतमजूर म्हणून काम करीत होत्या. त्याचे पती हे ड्रायव्हर म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या पश्चात पती, सासु, 10 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. अशा अकाली निधनाने जांभुळनगर गावावर शोककळा पसरली आहे.