एकूण सहा पंचायत समित्या तर चार जिल्हा परिषद मतदार संघ बिनविरोध
आमदार नितेश राणे यांचा देवगड मध्ये करिष्मा
अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे तालुक्यातील ३ पंचायत समिती मतदारसंघ आणि १ जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाले आहेत. विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने काही ठिकाणी बिनविरोध निवड निश्चित झाली असून, उर्वरित मतदारसंघांतील निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापूर्वी दोन जिल्हा परिषद मतदार संघ व तीन पंचायत समिती मतदार संघ बिनविरोध झाले आहेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा पंचायत समिती मतदार संघ तर चार जिल्हा परिषद मतदार संघ बिनविरोध घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व भाजपाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
३० फणसगावं पंचायत समिती (सर्वसाधारण महिला) बिनविरोध
३० फणसगावं पंचायत समिती सर्वसाधारण महिला मतदारसंघात शिवसेना (उबाठा)च्या रोहिणी संतोष लाड यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या समृद्धी संतोष चव्हाण या एकमेव उमेदवार राहिल्या. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे.
—
शिरगांव पंचायत समिती (सर्वसाधारण महिला) बिनविरोध
शिरगांव पंचायत समिती सर्वसाधारण महिला मतदारसंघात भाजपच्या शितल सुरेश तावडे या एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अपक्ष उमेदवार अदिती अजित परब तसेच शिवसेना (उबाठा)च्या मीरा मयुर सावंत यांनी आपले अर्ज मागे घेतले होते.
—
३४ कोटकामते पंचायत समिती (ना.मा.प्र महिला) बिनविरोध
३४ कोटकामते पंचायत समिती ना.मा.प्र महिला मतदारसंघात भाजपच्या ऋतुजा राकेश खाजणनाडकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अपक्ष शोभा पुरुषोत्तम राणे आणि शिवसेना (उबाठा)च्या प्रगती प्रदीप तेली यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड निश्चित झाली.
—
किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध
किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनस्वी महेश घारे आणि शुभांगी विठ्ठल राणे यांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर काँग्रेसच्या रेश्मा रविंद्र सावंत यांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या सावी गंगाराम लोके या एकमेव उमेदवार राहिल्या. परिणामी त्या या मतदारसंघातून बिनविरोध विजयी घोषित झाल्या आहेत.
१५ पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध
१५ पोंभुर्ले जिल्हा परिषद ना.मा.प्र महिला मतदारसंघात भाजपच्या अनुराधा महेशकुमार नारकर या एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे. या मतदारसंघातून शिवसेना (उबाठा)च्या दिपाली मनोहर मेस्त्री आणि अपक्ष रूपाली विश्वनाथ खानविलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीमुळे या मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली.
यापूर्वी पडेल मतदारसंघातून सुयोगी रविंद्र घाडी आणि बापर्डे मतदारसंघातून अवनी अमोल तेली, तर पंचायत समितीत पडेलमधून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडणमधून गणेश सदाशिव राणे आणि बापर्डेमधून संजना संजय लाड हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.












