जुनी आणि नवी आयकर प्रणालीत कोणताही बदल नाही
नवी कर व्यवस्था डीफॉल्टच कायम
आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुनी आणि नवी दोन्ही आयकर प्रणाली पूर्वीप्रमाणेच कायम ठेवली आहे. करदाते FY 2025-26 मध्ये लागू असलेल्या स्लॅबनुसारच कर भरणार आहेत. मागील अर्थसंकल्पात नवी कर प्रणाली मोठ्या प्रमाणात सुधारित करण्यात आल्याने यंदा बदल अपेक्षित नव्हते. नवीन आयकर कायदा लवकरच लागू होणार असल्याने स्थैर्य राखण्यावर भर देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2026-27 साठी आयकर स्लॅब जुनी आणि नवी आयकर प्रणाली अंतर्गत अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, सध्या लागू असलेले FY 2025-26 चे स्लॅबच पुढील वर्षासाठीही लागू राहतील. त्यामुळे करदात्यांना कर गणनेत कोणताही नवा बदल करावा लागणार नाही.
नवी आयकर प्रणाली ही डीफॉल्ट कर व्यवस्था म्हणून कायम आहे. या व्यवस्थेत निवासी करदात्यांसाठी वेगळे स्लॅब लागू असून ज्येष्ठ किंवा अति ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सूट मर्यादा नाही. या प्रणालीत साधे आणि सरळ कर दर ठेवण्यात आले आहेत.
नव्या आयकर प्रणालीअंतर्गत FY 2026-27 साठी आयकर स्लॅब पुढीलप्रमाणे आहेत :
0 ते 4 लाख रुपये – शून्य कर
4 ते 8 लाख रुपये – 5 टक्के
8 ते 12 लाख रुपये – 10 टक्के
12 ते 16 लाख रुपये – 15 टक्के
16 ते 20 लाख रुपये – 20 टक्के
20 ते 24 लाख रुपये – 25 टक्के
24 लाख रुपयांपेक्षा जास्त – 30 टक्के
या प्रणालीअंतर्गत दरमहा सुमारे 1 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीचा कर जवळपास शून्य येतो. मात्र मासिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ३० टक्के सर्वोच्च कर स्लॅब लागू होतो.
दरम्यान, जुनी आयकर प्रणाली देखील कोणताही बदल न करता कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, ही प्रणाली निवडण्यासाठी करदात्यांना आयकर विवरणपत्र भरताना स्पष्ट पर्याय निवडावा लागतो. 31 जुलैपूर्वी ITR न भरल्यास करदाता आपोआप नव्या कर प्रणालीत समाविष्ट होतो.
जुन्या आयकर प्रणालीअंतर्गत FY 2026-27 साठी आयकर स्लॅब पुढीलप्रमाणे आहेत :
0 ते 2.5 लाख रुपये – शून्य कर
2.5 ते 5 लाख रुपये – 5 टक्के
5 ते 10 लाख रुपये – 20 टक्के
10 लाख रुपयांपेक्षा जास्त – 30 टक्के
हे दर 60 वर्षांखालील निवासी करदात्यांसाठी लागू आहेत. 60 ते 80 वर्षांतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मूळ सूट मर्यादा 3 लाख रुपये असून, 80 वर्षांवरील अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे.
जुन्या आयकर प्रणालीत उपलब्ध प्रमुख सवलती व कपाती :
स्टँडर्ड डिडक्शन
घरभाडे भत्ता (HRA)
रजा प्रवास भत्ता (LTA)
कलम 80C अंतर्गत PPF, PF, ELSS, NPS (अतिरिक्त 50,000 रुपये)
कलम 80D अंतर्गत वैद्यकीय विमा
कलम 80TTA अंतर्गत बँक व्याज
कलम 80G अंतर्गत देणग्या
गृहकर्जावरील व्याज सवलत
एकूणच, कमी कपाती आणि सोपी रचना हवी असलेल्या करदात्यांसाठी नवी आयकर प्रणाली फायदेशीर ठरते, तर जास्त सवलतींचा लाभ घेणाऱ्यांसाठी जुनी आयकर प्रणाली उपयुक्त राहते.











