रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान अंदाज व कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. आगामी ५ दिवसांत, म्हणजेच ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नसून हवामान मुख्यत्वे निरभ्र आणि कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान अंदाज आणि तापमान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या माहितीनुसार, या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवेतील आर्द्रता सकाळी ६३ ते ७१% आणि दुपारी ४२ ते ५१% राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६ ते ७ किलोमीटर इतका राहील. विस्तारित अंदाजानुसार (ERFS), ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यानही कोकणात पाऊस पडण्याची शक्यता नाही आणि दक्षिण कोकणात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते.
आंबा व काजू बागेसाठी विशेष सल्ला वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांच्या खोडाला ‘बोर्डो पेस्ट’ लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आंबा झाडांवर फळधारणा झाली असल्यास प्रति झाड १५०-२०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. तसेच, फळमाशीपासून संरक्षणासाठी एकरी २ ‘रक्षक सापळे’ लावावेत आणि फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घालावे. काजू बागेत ‘टी-मॉस्किटो बग’ आणि ‘फुलकिडी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा प्रोफेनोफॉसची फवारणी शिफारसीनुसार करावी.
पीक संरक्षण व व्यवस्थापन
-
भुईमूग: सध्या पीक फुलोरा ते आरे फुटण्याच्या अवस्थेत असल्याने ८-१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टिक्का व तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा डिफेनकोनाझोलची फवारणी करावी.
-
भाजीपाला: मिरची, वांगी आणि टोमॅटो पिकांवर फुलकिडे व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी निळे व पिवळे चिकट सापळे वापरावेत. कलिंगड पिकाला उन्हापासून वाचवण्यासाठी पेंढ्याने झाकून घ्यावे.
-
नारळ व सुपारी: ५ वर्षांवरील नारळाच्या माडांना खताची तिसरी मात्रा द्यावी. माडांना जमिनीच्या प्रकारानुसार नियमित पाणी द्यावे.
-
हळद व काळीमिरी: पक्व झालेल्या हळदीची काढणी करून वाळवण्यास ठेवावी. काळीमिरीची काढणी करून ती गरम पाण्यात बुडवून उन्हात वाळवावी.
पशुपालन तापमानातील वाढ लक्षात घेता, पशुपालकांनी जनावरांना दिवसभर पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.












