सकाळपासूनच मतदारांचा उत्साह
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला अत्यंत शांततेत सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १६९३ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, लोकशाहीच्या या उत्सवात नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. एकूण ४२८६ मतदान यंत्रांच्या (EVM) माध्यमातून मतदान प्रक्रिया राबवली जात असून, ५४५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या कामात गुंतलेला आहे. कालपासूनच मतदान साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले होते. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्रे असून, सर्वत्र अत्यंत चोख नियोजन करण्यात आले आहे.
महिला मतदारांची संख्या लक्षणीय जिल्ह्यातील एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार आज उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विशेष म्हणजे, यंदाही रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. ५ लाख ६४ हजार ९७६ पुरुष मतदारांच्या तुलनेत ६ लाख ८ हजार ९९३ महिला मतदार असून, सकाळच्या सत्रात महिला मतदारांचा केंद्रांवर मोठा सहभाग दिसून येत आहे.
निवडणूक रिंगणातील चित्र रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, तर जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या एकूण ११२ गणांसाठी ४३४ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाने जिल्ह्याचा ताबा घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ८६ पोलीस अधिकारी आणि १५३५ पोलीस अंमलदार तैनात आहेत. त्यांना १८५३ होमगार्ड तसेच एसआरपीएफ (SRPF) च्या २ कंपन्या आणि आरसीपी (RCP) च्या २ प्लाटूनची मदत मिळत आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व नागरिकांना निर्भयपणे घराबाहेर पडून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.













