योजना असुरक्षित व अनियंत्रित असल्याचा आरोप
१५ दिवसांत रहिवाशांची सल्लामसलत न झाल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा
विमाननगर परिसरात लागू करण्यात आलेली एकेरी वाहतूक योजना तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करत येथील रहिवासी कनीज सुखरानी यांनी पुणे पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सार्वजनिक सल्लामसलतीशिवाय, योग्य नियोजन न करता आणि सुरक्षेचा विचार न करता ही योजना लागू करण्यात आल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
पुणे : विमाननगर परिसरात अलीकडेच राबवण्यात आलेल्या एकेरी वाहतूक योजनेविरोधात रहिवाशांचा असंतोष वाढत असून, कनीज सुखरानी यांनी या संदर्भात पुणे पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये १५ दिवसांच्या आत रहिवाशांची सल्लागार बैठक न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सुधारित वाहतूक आराखडा औपचारिकरीत्या लागू करण्यात आला. त्यानुसार गंगापुरम चौक ते गणपती मंदिर चौक आणि श्रीकृष्ण चौक ते सीसीडी चौक हे मार्ग एकेरी कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करण्यात आले.
प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहनांचा वेग वाढेल, असे फायदे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी, “जमिनीवरील वास्तव याच्या पूर्णपणे उलट आहे,” असा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या योजनेमुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांसाठी गोंधळ, गर्दी आणि गंभीर सुरक्षा धोके निर्माण झाल्याचे सुखरानी यांनी म्हटले आहे.
योग्य वाहतूक सिग्नल, रस्त्यावरील खुणा आणि सुरक्षित पादचारी क्रॉसिंगचा अभाव असल्याचा आरोपही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. तसेच, पार्किंग नियमांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, व्यावसायिक वाहनांकडून होणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर पार्किंगकडे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
नोटीसमध्ये सध्याची एकेरी वाहतूक प्रणाली तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून, पर्याय म्हणून पीक-अवर निर्बंध, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि बेकायदेशीर पार्किंगविरोधात कठोर कारवाई करण्याचे सुचवण्यात आले आहे.











