सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सरासरी ६९.५० टक्के मतदान 

मतदान प्रक्रिया शांततेत : वृद्धांनीही बजावला मतदानाचा हक्क 

सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यात सरासरी ६९.५० टक्के मतदान झाले. तालुक्यातील एकूण १ लाख ४ हजार मतदारांपैकी सुमारे ७२ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात महिला मतदारांचे प्रमाण लक्षणीय होते. तालुक्यातील एकूण ९ जिल्हा परिषद मतदार संघांपैकी बांदा जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समिती गणांपैकी शेर्ले पंचायत समिती पूर्वीच बिनविरोध झाली होती त्यामुळे एकूण ८ जिल्हा परिषद गट व १७ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

निवडणुकीसाठी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांचा संमिश्र असा प्रतिसाद पाहायला मिळाला तळवडे आणि कोलगाव हे दोन हाय होल्टेज मतदार संघ वगळता सर्वत्र हेच चित्र पाहायला मिळाले. तळवडे आणि कोलगाव मध्ये सकाळी ११ वाजले पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. सर्वत्र शांततेत आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय ही प्रक्रिया पार पडताना दिसून आली.

सावंतवाडी तालुक्यात एकूण नऊ जिल्हा परिषद आणि १८ पंचायत समिती निर्वाचन गण आहेत. यासाठी तब्बल १४३ मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली शुक्रवारी दुपारीच ही सर्व यंत्रणा मतदान केंद्रावर दाखल झाली होती. सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला सुरुवातीपासूनच अल्प असा प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाटच पाहायला मिळत होता हळूहळू त्यानंतर मतदार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येऊ लागले. परंतु हा प्रतिसाद दुपारपर्यंत तुरळक असा दिसून आला. सुशिक्षित मतदार वर्ग सुद्धा मतदान करण्यासाठी काहीसा बाहेर पडताना दिसून आला नाही दुपारपर्यंत सर्वत्र ही स्थिती पाहायला मिळत होती. तालुक्याचा विचार करता साडेअकरा वाजेपर्यंत २६ टक्के एवढेच मतदान झाले होते. मतदारांमध्ये असलेली नाराजी यामागचे कारण असल्याचे अनेकातून सांगण्यात आले. त्यामुळे मतदानासाठी ज्या उत्साहाने मतदानासाठी मतदार बाहेर पडत होता तो उत्साह आज मतदाराच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता.

सावंतवाडी तालुक्यात कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघ आणि तळवडे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काहीसे चुरशीची लढत होत आहे. या ठिकाणी मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले त्या ठिकाणच्या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी सकाळपासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडताना दिसून आले बऱ्याच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या ज्येष्ठ महिला पुरुष तसेच दिव्यांग व्यक्ती नाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आणताना दिसून येत होते. या मतदान केंद्रातील गावागावांमध्ये मतदान केंद्र बाहेरील बुथवर सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यापलीकडे पाहता आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात आणि आरोंदा या जिल्हा परिषद मतदार संघातही मतदारांची गर्दी पाहायला मिळत होती. कुठेही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची किंवा मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होण्याची घटना पाहायला मिळाली नाही बांद्यामध्ये एका मतदान केंद्रावर डिस्प्लेवर काहीतरी बिघाड वगळता दुपारपर्यंत तालुक्यात कुठेही ही प्रक्रिया थांबली नव्हती प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर पोलीस यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त पाहायला. झोनल अधिकारी प्रत्येक मतदान केंद्रावर देखरेख ठेवताना दिसून आले. अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर तसेच अन्य गोष्टींचा समावेश सुद्धा या मतदानाच्या वेळी करताना दिसून आला. कोलगाव आणि तळवडे या दोन ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात आली होती.

तालुक्यात बहुतेक ठिकाणी महायुतीद्वारे निवडणूक लढवली जात असताना बऱ्याच ठिकाणी अपक्षांकडूनही उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर अपक्षांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बुथ पाहायला मिळाले. अपक्ष उमेदवाराकडून तसेच पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना बाहेर काढण्याची धडपड ही दिसून आली.