दोन बंधू, एक रणनीती; सिंधुदुर्गातील सत्ता राणेंच्याच हाती

राजकीय

संतोष राऊळ

सिंधुदुर्ग जिल्हा आणि राणे हे समीकरण राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक घट्ट होत गेलेले पाहावयास मिळते. लोकसभे पासून ग्रामपंचायती पर्यंत कोणतीही निवडणूक ही राणे या नेतृत्वाभोवती फिरते. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा याची प्रचिती आली.विशेष म्हणजे खासदार नारायण राणे यांनी एकही सभा न घेता प्रचाराची जबाबदारी पालकमंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे आणि आमदार असलेले चिरंजीव निलेश राणे यांच्या खांद्यावर देऊन ही निवडणूक दोन्ही मुलांवर सोपवली या दोन्ही कर्तबगार नेतृत्व असलेल्या मुलांनी ती यशस्वीरित्या विजयी केली. भाजपचे नेते असलेल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नितेश राणे यांनी ३१ जागा कमळ निशाणी वर लढवून २७ जागांवर विजय संपादन केला. आमदार निलेश राणे यांनी १९ जागा लढवून १४ जागांवर विजय संपादन केला. ५० जागांपैकी ४१ जागा शिवसेना-भाजप महायुतीच्या निवडून आणल्या. यामुळे सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेवर एक हाती महायुतीची सत्ता बसली आहे. काही ठिकाणी बंडखोर करून अपक्ष निवडून आणलेल्या मंडळींना राणेंच्या या एकतर्फी विजया मुळे महत्वच उरलेले नाही. राणेंचे प्राबल्य सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार हे या आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

आकड्यांचे गणित भाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ या दोन मतदारसंघातच निलेश राणे आणि नितेश राणे या दोन बंधूंनी मिळवलेले सदस्य यांची संख्या तीस वर पोचली आहे. म्हणजेच सत्तेची समीकरणे या दोन मतदारसंघातून पूर्णत्वस गेली. सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात झालेली बंडखोरी पाहता असे कोणतेही प्रयत्न राणेंसमोर चालत नाही. आणि ते खपूनही घेतले जात नाही हेच या दोन मतदारसंघातून दाखवून दिले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा केला. पहिल्या दौऱ्यात बंडखोर शांत होणार नाहीत हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दुसरा दौरा केला आणि अशी जादूची कांडी फिरवली की त्या ठिकाणचे बंडखोर वन वन फिरले मात्र विजय मिळवू शकले नाही. या ठिकाणच्या तिन्ही जागा महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यात भाजपच्या दोन आणि शिंदे सेनेची एक जागा आहे. म्हणजेच जेव्हा राणे बंड मोडायचे असते त्यावेळी राणे खंबीरपणे उभे राहतात आणि बंड मोडून काढतात जी माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील रामा गवस, साटेली भेडशी ची श्वेता धरणे हे नवोदित उमेदवार, अनुभवी उमेदवारांसमोर टिकणार नाही अशा पद्धतीची माहिती पुढे आणलेली होती मात्र त्याच उमेदवारांना पालकमंत्र्यांनी पाठिंबा देत भरघोस मतांनी निवडून आणले.याचाच अर्थ राणे जे ठरवतात तेच करतात. कोणत्याही दबावाला ते बळी पडत नाहीत हेच दिसून आले.

राणे हे एक नाव मात्र ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ( शिंदे) अशा दोन्ही ठिकाणी विभागलेल्या आहे. खासदार नारायण राणे हे भाजपच्या चिन्हावर खासदार आहेत नितेश राणे हे भाजपचे आमदार आणि मंत्री आहेत तर निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत असे असताना या दोन्ही पक्षांना एका गाठीत बांधण्याचे काम खासदार नारायण राणे यांनी केले. निवडणुकीच्या सुरुवातीला पत्रकार परिषद घेऊन भाजप शिवसेना महायुती जाहीर केली जागांचे वाटप केले उमेदवार निश्चित केले आणि प्रचाराची जबाबदारी दोन्ही मुलांच्या खांद्यावर दिली. आणि त्या दोन्ही मुलांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडले आणि पुन्हा एकदा सिंधुदुर्ग हा प्राण्यांचा आहे राणें चाच राहणार आणि सिंधुदुर्गात राणेंच फॅक्टर चालणार हे दाखवून दिले.दोन बंधू, एक रणनीती एक विचार एक प्लॅनिंग करून सिंधुदुर्गात सत्तेचा खेळ राणेंच्या हाती ठेवण्यास यशस्वी झाले ते राणेंच!.