एर्नाकुलम–एलटीटी रेल्वेत मूकबधिर मुलगा आढळला

कणकवलीत आरपीएफकडे सुरक्षित सुपूर्द

नातेवाईकांकडे पोहोचणे पोलिसांना झाले कठीण

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एर्नाकुलम–एलटीटी एक्स्प्रेसमध्ये दहा ते बारा वर्षांचा एक मूकबधिर मुलगा रेल्वेत इकडे – तिकडे फिरताना रेल्वेच्या लोकोपायलटच्या निदर्शनास आला. प्रसंगावधान राखत, रेल्वे कणकवली रेल्वे स्थानकात क्रॉसिंगवर थांबली असता लोकोपायलटने त्या मुलाला सुरक्षितपणे रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारे ४.३० वा. च्या सुमारास उघडकीस आली.

यानंतर आरपीएफ पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याला ऐकता व बोलता येत नसल्याचे स्पष्ट झाले. संवाद साधण्यात अडचण येत असल्याने तसेच कोणतीही ओळख, माहिती उपलब्ध नसल्याने त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी कठीण ठरले आहे. दरम्यान, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर मुलाला तात्पुरत्या स्वरूपात बाल सुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असल्याचेही रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.