जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील नेत्रदीपक यशाने आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व अधोरेखित

शिवसेनेच्या एकतर्फी विजयाची ही पहिलीच नांदी, विरोधकांना आत्मचिंतन करण्याची गरज

संतोष कोत्रे
लांजा -: सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या‌ निकालांती शिवसेनेने मिळविलेल्या न भूतो न भविष्यती अशा विजयाच्या वादळात विरोधकांची दाणादाण उडाली आहे.‌ या एकतर्फी विजयामुळे
आमदार किरण सामंत यांचे नेतृत्वगुण झळाळून निघाले आहेत. तर दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या शिवसेना उबाठा पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांना यामुळे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.‌
किंगमेकर अशी बिरूदावली मिरवणाऱ्या आमदार किरण सामंत यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतच नेतृत्वगुणाची‌ झलक दाखवून दिली होती.‌ त्यानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्येही आमदार किरण सामंत यांनी नवख्या उमेदवारांना उमेदवारी देत नगराध्यक्षांसहित वहा नगरसेवक निवडून आणून नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. या निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.‌
या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मागील पराभवापासून बोध घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काही करिष्मा घडवतील अशी शक्यता व्यक्त होत होती.‌ विशेषता भांबेड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उबाठाच्या अचला विश्वासराव या विजय संपादन करतील अशी सुरुवातीपासूनच हवा होती. मात्र या ठिकाणी आमदार किरण सामंत यांच्या करिश्मामुळे शिवसेनेच्या विनिता गांगण यांनी अचला विश्वासराव यांचा पराभव केला.‌ विनिता गांगण यांच्याबाबत काहीसे नाराजीचे वातावरण असतानाही त्यांनी विजय प्राप्त केला.‌ हा पराभव ठाकरे शिवसेनेचा जिव्हारी लागला आहे.‌ आसगे जिल्हा परिषद गटातील लढतही हाय व्होल्टेज मानली जात होती.‌ या गटात शिवसेना उबाठाच्या युवा सेनेचे तालुकाधिकारी असलेल्या अभिजीत राजेशिर्के यांनी पत्नी अनन्या राजेशिर्के यांना रिंगणात उतरवून मोठी रंगत आणली होती.‌ राजेशिर्के या अनपेक्षितपणे बाजी मारतील असे वाटत असतानाच शिवसेनेचे चाणक्य अशी ओळख असलेल्या गणेश लाखण यांनी १७०९ मतांचे लीड घेत पत्नी मनीषा लाखण यांना निवडून आणले.
साटवली आणि गवाणे या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस आणि उबाठाकडून तुल्यबळ
उमेदवार न दिले गेल्याने या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार लीला घडशी आणि संतोष रेवाळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.‌ त्याचप्रमाणे या दोन्ही गटात काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी म्हणावे तसे लक्ष न दिल्यानेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणांपैकी भांबेड गवाणे, खानवली, वेरवली खुर्द या चार ठिकाणी शिवसेना उबाठा पक्षाला विजयाची आशा होती. भांबेड गणात माजी उपसभापती असलेले युवराज हांदे, खानवली गणात माजी उपसभापती लक्ष्मण मोर्ये विजय मिळवतील अशी आशा होती.‌तर गवाणे गणात शिवसेनेकडून दिपाली साळवी यांच्या रूपाने पार्सल उमेदवार दिल्याने नाराजीचा फायदा आपल्याला मिळेल असे उबाठा पक्षाला वाटत होते.‌ वेरवली खुर्द गणात देखील आपलीच बाजी होईल असे त्यांना वाटत होते. मात्र या चारही गणात शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून शिवसेनेने तीन व भाजपाने एक अशा चारही गणात विजय संपादन केला आहे.‌ कर उर्वरित आसगे, प्रभानवल्ली, वाकेड आणि साटवली गणावरही शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या निवडणुकीत उबाठा पक्षाच्या पराभवाचे आणखी कारण म्हणजे पक्षाकडे असलेल्या सक्षम उमेदवाराची वानवा हे होय.‌ शिवसेना पक्षफुटी नंतर
पक्षाच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी‌ आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली होती.‌ तर निवडणुकीत उमेदवारांना आवश्यक ती रसद तसेच ताकद पुरवण्यात उबाठा पक्षाचे नेते कमी पडले.
तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेने एकतर्फी विजयाची नांदी केली आहे. या निकालाने आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर तालुक्यातील जनतेचा विश्वास असल्याचे सिद्ध झाले असून पराभवाचा जबर धक्का बसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आले आहे हे मात्र निश्चित.‌