पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सौ. जयश्री विजय मोहिते (वय २७, रा. आकले तळवडेवाडी, ता. चिपळूण) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील नामदेव लक्ष्मण मोहिते (वय ७६, रा. पेरणे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेत पती विजय भगवान मोहिते, भगवान शिवा मोहिते, सौ. कुसुम मोहिते, राजू भगवान मोहिते आणि नेताजी भगवान मोहिते (सर्व रा. आकले तळवडेवाडी) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री यांचा विवाह ३ जुलै २०१७ रोजी विजय मोहिते यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीची चार वर्षे त्यांचा संसार सुरळीत चालला, मात्र त्यांना अपत्य झाले नाही. याच कारणावरून सन २०२२ पासून पती आणि सासरच्या इतर चार नातेवाईकांनी जयश्री यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सासरच्या या सततच्या छळाला कंटाळून जयश्री यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ८५, १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










