अमली पदार्थ विक्री करणाऱ्या बिहारच्या तरुणाला अटक

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जयगड पोलिसांची धडक कारवाई

रत्नागिरी: प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या “मिशन फिनिक्स” अंतर्गत जयगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जयगड परिसरातील जे.एस.डब्लू. लेबर कॉलनी जवळ अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या एका संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून २३,५२० रुपये किमतीचा ७३४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:५५ वाजेच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी नांदिवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ, जे.एस.डब्लू. लेबर कॉलनीच्या कंपाउंड भिंतीजवळ एक इसम सॅक घेऊन संशयास्पद रितीने उभा असलेला आढळला.

पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव सिंटू कुमार राम मिस्त्री (रा. खगरीया, बिहार; सध्या रा. जे.एस.डब्लू. लेबर कॉलनी, नांदिवडे) असे सांगितले. संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये ७३४ ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा “गांजा” सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी सिंटू कुमार याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर जयगड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपसे, पोलीस हवालदार मिलिंद कदम, संतोष शिंदे आणि पोलीस शिपाई प्रितेष लोटणकर यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.