रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद कामकाजाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
अजय बिरवटकर हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेव्हणे आहेत. खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला, ज्यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. यामध्ये पक्षाला मोठे यश मिळाले असून खेड, दापोली आणि चिपळूण या पट्ट्यात पक्षाने जोरदार मुसंडी मारली. रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे एकूण ५ सदस्य निवडून आले आहेत. महायुती म्हणून राज्यात एकत्र असले तरी, जिल्ह्यात स्वतंत्र लढून पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
राज्यात जरी महायुतीचे (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) सरकार असले, तरी रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय सध्या राखून ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
“माझी गटनेता म्हणून निवड झाली असली, तरी आमच्या या विजयाचे संपूर्ण श्रेय आम्ही आदरणीय अजित पवार यांना समर्पित करतो. निवडून आलेले सर्व ५ सदस्य एकजुटीने काम करणार असून जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— अजय बिरवटकर, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)












