जिल्ह्यातील पहिले तर राज्यातील निवडक २४ महाविद्यालयांमध्ये स्थान….
सावंतवाडी । प्रतिनिधी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्मसी) विभागाला भारत सरकारच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन’, नवी दिल्ली यांचेकडून एनबीए मानांकन प्राप्त झाले असून, अशी कामगिरी करणारे हे भारतातील २८ वे महाविद्यालय ठरले आहे. महाराष्ट्रातील ७०९ महाविद्यालयांपैकी हे मानांकन मिळवणारे २४ वे, कोकणातील चौथे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव एनबीए मानांकित महाविद्यालय होण्याचा मान संस्थेला मिळाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत एनबीए आणि नॅक ही दोन्ही प्रतिष्ठित मानांकने मिळवून महाविद्यालयाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील आपले स्थान ठळकपणे अधोरेखित केले आहे.
एनबीएच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयातील शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, औद्योगिक व रुग्णालयांच्या भेटी, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आणि उद्योजकता विकास अशा विविध निकषांची कठोर तपासणी केल्यानंतर हे मानांकन जाहीर केले. आतापर्यंत डी.फार्मसीच्या सहा तुकड्यांमधील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सिप्ला, ग्लेनमार्क, लुपिन, डॉ.रेड्डीज आणि सॅंडोझ यांसारख्या नामवंत औषधनिर्माण कंपन्यांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. अनेक विद्यार्थी शासकीय व खाजगी क्षेत्रातील वेलनेस, अँटीला, वुई केअर सारख्या नामांकित चेन मेडिकल शॉप्समध्ये कार्यरत आहेत, तर काहींनी स्वतःचे यशस्वी होलसेल व रिटेल व्यवसाय उभारले आहेत. अनेक विद्यार्थी बी.फार्म, एम.फार्मचे उच्चशिक्षण घेत आहेत.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, विभागप्रमुख स्नेहा सावंत व एनबीए समन्वयक सत्यजित साठे या सर्वांचे मार्गदर्शन, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि विद्यार्थी व पालकांचे सहकार्य यामुळे संस्थेला ही कामगिरी बजावता आली. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले आणि सचिव संजीव देसाई यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











