वेंगुर्ले : दाजी नाईक
सोमवती अमावास्येनिमित्त कुडाळ तालुक्यातील उपवडे गावची ग्रामदेवता आणि तरंगदेवतांनी आपल्या भक्तांसह भक्तिमय वातावरणात वेंगुर्ले येथील उभादांडा सागरेश्वर समुद्र किनारी तीर्थस्नान केले. देवांचे तीर्थस्थान झाल्यावर भाविकांनी या पाण्यात उतरत तीर्थस्थानाचा आनंद घेतला. यावेळी मोठ्या संख्येने तेथील ग्रामस्थ, भाविक सहभागी झाले होते.
सोमवारी सोमवती अमावास्या आल्याने तीर्थस्नान करण्यासाठी उपवडे गावची श्री पावणाई-रवळनाथ आदी ग्रामदैवत पालखीसह तसेच श्री रवळनाथ, श्री भूतनाथ आणि श्री पावणाई आदी तरंगदेवता यांचे वेंगुर्ला येथे सायंकाळी आगमन झाले आहे. वेंगुर्ला शहरात प्रवेश केल्यानंतर या देवस्वारीने प्रारंभी श्री देवी सातेरीची भेट घेतली. त्यानंतर श्री देव रामेश्वराची भेट घेत श्री क्षेत्र सागरेश्वर समुद्र किनारी जात तेथे तीर्थस्नान केले. यावेळी उपवडे गावातील बहुसंख्य भाविकांनीही या तीर्थस्नानाचा लाभ घेतला. या तीर्थस्नानानंतर ही देवस्वारी आपल्या भक्तांसह देवी सातेरी मंदिरात मुक्कामाला थांबली असून मंगळवारी सकाळी आपल्या गावी निघणार आहे. दरम्यान, वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी या देवतांचे दर्शन घेत नारळ, केळी, ओटी अर्पण केली.














