आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील सुविधा वाढीसाठी प्रयत्नशील : नगराध्यक्षा ममता वराडकर

मालवण रुग्णालयातील डायलेसीस व अन्य सुविधांचा घेतला आढावा

मालवण | प्रतिनिधी : डायलेसीस रुग्णांची वाढती गरज व प्रतीक्षा यादी लक्षात घेता मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीन व टेनक्निशियन संख्या आणखी वाढवणे गरजेची आहे. अशी भुमिका मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे मांडली.

रुग्णालयातील डायलिसीस सुविधा व इतर आवश्यक सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधुन अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नाशील असल्याचे नगराध्यक्षा वराडकर यांनी सांगितले.

मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, उपगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयाच्या इतर विभागांची पाहाणी करून तेथील समस्या, कमतरता व आवश्यक सोयीची माहिती घेतली.

यावेळी नगराध्यक्ष सौ. वराडकर व सौ. पूनम चव्हाण यांनी रुग्णालयातील डायलिसीस सुविधा पुरेशी नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय मांडली. यावेळी उपस्थित टेक्निशियन कडून रुग्णालयात दोन डायलिसीस मशीन असून एक टेक्निशियन, दोन परिचारिका आहेत, दिवसाला दोन सत्रात चार रुग्णांचे डायलिसीस होत असून सध्या बारा रुग्ण असून सहा रुग्ण प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

नगराध्यक्ष म्हणाल्या ज्यादा डायलिसीस मशीन साठी रुग्णालयाकडून मागणी पत्र आम्हाला द्यावे, याबाबत आम. निलेश राणे यांचे लक्ष वेधून आणखी डायलिसीस मशीन व आवश्यक टेक्निशियन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

तसेच रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञझालं इतर डॉक्टर, कर्मचारी यांचीही कमतरता असल्याने या सर्व आवश्यक बाबींचीही माहिती द्यावी, त्याबाबतही आम. राणे यांचे लक्ष वेधू व रुग्णालयास आवश्यक ते सहकार्य करू असे यावेळी नगराध्यक्ष सौ. वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. पाटकर, सौ. पूनम चव्हाण व सौ. अश्विनी कांदळकर यांनी सांगितले.