उन्हाचा तडाखा वाढणार; पिकांच्या पाणी नियोजनाकडे द्या लक्ष!

कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

दापोली (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काळात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, कडक उन्हाचा कडाका वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जाहीर केला आहे. तापमानातील वाढ आणि कोरड्या हवामानाचा अंदाज पाहता, पिकांना गरजेनुसार व नियमित अंतराने पाणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हवामान अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात पर्जन्यमानाची शक्यता नाही. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९१ टक्क्यांच्या दरम्यान असेल.

आंबा व काजू बागायतदारांसाठी सल्ला

आंबा: फळधारणा झाली असल्यास १५ दिवसांच्या अंतराने झाडाला १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. फळमाशीपासून संरक्षणासाठी फळमाशी रक्षक सापळे एकरी २ या प्रमाणात लावावेत. तसेच फळांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कागदी पिशव्यांचे आवरण घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काजू: दमट वातावरणामुळे काजूवर ‘टी मोस्किटो बग’ (काजूवरील ढेकण्या) आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा प्रोफेनोफॉसची फवारणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावी. नवीन कलमांना ८ दिवसांच्या अंतराने ३० लिटर पाणी द्यावे.

इतर पिकांचे व्यवस्थापन

नारळ व सुपारी: नव्याने लागवड केलेल्या रोपांना प्रखर उन्हापासून वाचवण्यासाठी शेडनेट किंवा झावळ्यांच्या साहाय्याने सावली करावी. पाच वर्षांवरील नारळाच्या माडांना खतांची तिसरी मात्रा देऊन तातडीने पाणी द्यावे.

कलिंगड: कलिंगडाची फळे उन्हामुळे चटू नयेत म्हणून ती भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून ठेवावीत.

भाजीपाला: मिरची, वांगी आणि टोमॅटो पिकांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पशुधन व कुक्कुटपालन

वाढत्या उन्हाचा फटका जनावरांना बसू नये म्हणून त्यांच्यासाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी. जनावरांना दुपारच्या वेळी चरण्यासाठी बाहेर सोडू नये. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी शेडच्या छतावर गवत किंवा झावळ्या टाकून तापमान कमी राखण्याचा प्रयत्न करावा.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आले आहे.