शिवरायांचे समतावादी धोरण व वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्या – ॲड संतोष कुळे

पोसरे सुतारवाडी येथे शिवजयंती साजरी

चिपळूण : छत्रपती शिवराय म्हणजे आपला श्वास आणि ध्यास असला पाहिजे. आपला स्वाभिमान आणि अभिमान म्हणजेच छत्रपती शिवराय होय. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतावादी धोरण लक्षात घेऊन अशी कृती केली पाहिजे. त्यांची विचारधारा जनमाणसामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली असे म्हणता येईल, असे मत पत्रकार ॲड संतोष भाई कुळे यांनी व्यक्त केले.

चिपळूण तालुक्यातील जय हनुमान सेवा मंडळ पोसरे सुतारवाडी येथे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड. कुळे बोलत होते. या कार्यक्रमाला ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस माधव कांबळे यांची उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमात पुढे मार्गदर्शन करताना ॲड. श्री. कुळे म्हणाले की, शिवजयंती साजरी करताना काही तत्व आपण पाळली पाहिजेत. आपल्या आचरणामध्ये जर छत्रपतींचे विचार दिसून येत नसतील तर आपण अशा कितीही शिवजयंती साजऱ्या केल्या, मिरवणुका काढल्या तरी त्याचा उपयोग शून्य आहे. शिवरायांचे विचार आणि कार्य समजून घेण्याची गरज आहे. तीनशे वर्ष होऊन गेलेल्या राजाचे नाव आजही घेतले जाते आणि त्यांचा इतिहास सांगितला जातो यावरूनच आपले महाराज किती महान होते हे दिसून येते, हे त्यांनी सांगितले. इतिहास समजून घेतना फक्त शाहिस्तेखानाची बोटे छाटली, अफजलखानाचा कोथळा काढला, आग्र्याहून महाराज पसार या घटनांपेक्षाही शिवरायांची कामगिरी आणि त्यांचा इतिहास वेगळा आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यांनी व्याख्यानामध्ये शिवरायांचे आरमार दल, युद्ध कौशल्य, न्यायव्यवस्था, शासन कारभार अशा विविध मुद्द्यांवरती प्रकाश टाकला आणि साध्या सोप्या भाषेत शिवभक्तांना मार्गदर्शन केले. त्यांनी खऱ्या अर्थाने शिवजयंती ही तारखेप्रमाणे करावी की तिथीप्रमाणे करावे याचीही माहिती सविस्तर स्वरूपात सांगितली.
शिवरायांनी प्रत्येक मावळ्याच्या मनात स्वराज्य निष्ठा आणि प्रामाणिकपणा ही भावना रुजवली. असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी माधव कांबळे यांनीही शिवरायांचा सामाजिक दृष्टिकोन समजून सांगितला.

या कार्यक्रमाला पोसरे कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश आदावडे, सूर्यकांत तांदळे उपसरपंच प्रणाली तामुंडकर आणि जय हनुमान सेवा मंडळ पोसरे सुतारवाडी येथील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित मेस्त्री यांनी केले