बामणोली येथे शिवजयंती सोहळा रंगला
चिपळूण : शिवजयंती साजरी करणे म्हणजे डी जिच्या तालावर ठेका धरून नाचणे नव्हे. मिरवणुका काढणे किंवा रॅली काढत घोषणाबाजी करणे म्हणजे शिवजयंती नाही. तर खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये शिवरायांचे विचार, कार्यप्रणाली, त्यांचा वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन कृतीतून आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करणे हा खरा शिव विचार आहे. आपल्या मनामध्ये शिवजागराची ज्योती अशीच सदैव अखंडपणे तेवत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सहसचिव आणि ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस माधव कांबळे यांनी केले.
चिपळूण तालुक्यातील बामणोली येथे कुणबी समाज संघटना शाखा बामनोली आणि अशोक वनगे व परिवार यांच्या माध्यमातून शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून माधव कांबळे बोलता होते.
सकाळी १०.३० वाजता प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व त्यानंतर दिवसभर अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. याच कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढे श्री. कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि आता आपण जगत असलेला काळ यात बराच फरक आहे. मात्र त्या काळातल्या माणसांमध्ये जी स्वामीनिष्ठा, देशभक्ती आणि आदर भाव जोपासण्याची पद्धत होती ती आता आपल्या वर्तमानकाळात जगताना निश्चितच दिसून येत नाही. शिवाजी महाराजांनी जी माणसे घडवली त्या माणसांमध्ये निष्ठा आणि प्रामाणिकपणा रुजलेला होता. अशी माणसे घडवण्यासाठी आपण शिवविचार जोपासला पाहिजे असेही त्यांनी बोलताना सांगितले. त्यांनी शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन यावरती प्रकाश टाकला. शिक्षण घेतल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही असे त्यांनी सांगितले. समता, न्याय आणि बंधुता ही नीतिमूल्य प्रत्येकाने जपली पाहिजे तरच आपल्याला शिवाजी महाराजांचा विचार आपल्या कृतीतून जोपासता येईल. या शिवविचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवत आयुष्यामध्ये बदल घडवला पाहिजे असे त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान अशोक वनगे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राथमिक मराठी शाळा बामणोली आणि आदर्श विद्यामंदिर चिवेली येथील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी मनोगत व्यक्त करून आपल्यातील वकृत्व कलेची झलक दाखवून दिली. आरती निराधार फाउंडेशन मालघर येथील निराधार वृद्ध आणि दिव्यांग यांनी सुद्धा शिवजयंतीच्या कार्यक्रमाला भेट दिली. या सर्वांचा अशोक वनगे यांच्या हस्ते गौरव करून त्यांना भेटू वस्तू देण्यात आली. गावातील ग्रामस्थ आणि मुंबईतून सुध्दा चाकरमानी आले होते.
या कार्यक्रमाला नवनिर्वाचित उमरोली जिल्हा परिषदचे सदस्य प्रमोद निवळकर, पंचायत समिती गण सदस्या सुप्रिया वंजारे, सौ नीलम गोंधळी, निशा भोबसकर, प्रभाकर जाधव, कापसाळ गणातून निवडून आलेले सदस्य सुभाष जाधव, सुशांत जाधव, विनोद कदम, संदेश कदम, प्रीतम वंजारे, राजू थरवल, संदीप चव्हाण, प्रथमेश भोबसकर, संतोष गोंधळेकर, आणि अशोक वनगे यांची मित्रमंडळी उपस्थित होती. रात्री खास सर्वांच्या मनोरंजनासाठी लांजा येथील नमुनाचा कार्यक्रम सुद्धा सुंदर झाला. त्याआधी कीर्तन हभप ईश्वरी येसरे कळंबनी खेड हिचे कीर्तन सादर झाले.
या कार्यक्रमासाठी नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी आणि कुणबी समाज संघटनेचे सचिव नरेश पागडे आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड संतोष कुळे व सुहास किजबिले यांनी केले.








