यूके आयटी अभियंता व सीमाशुल्क-सीबीआय अधिकाऱ्यांची तोतयागिरी
कस्टम ड्युटी व कोर्ट शुल्काच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी
पुण्यातील एका आयटी डेटा विश्लेषक महिलेला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ११.५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी यूकेमध्ये राहणाऱ्या आयटी अभियंत्याची तसेच दिल्लीतील सीमाशुल्क व सीबीआय अधिकाऱ्यांची बनावट ओळख वापरून विश्वास संपादन केला. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी पीडितेने दागिने विकून आणि बचत खर्चून रक्कम आरोपींना पाठवली. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पुणे : कवडीपथ, लोणी काळभोर परिसरातील रहिवासी आणि हडपसर येथील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या आयटी डेटा विश्लेषक महिलेची ११.५२ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही फसवणूक डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडली. पीडितेने शनिवारी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, पीडितेचे एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते होते. ५ डिसेंबर रोजी संशयितांनी तिच्याशी संपर्क साधून मैत्री केली. आरोपीने स्वतःला यूकेमध्ये राहणारा सॉफ्टवेअर अभियंता असल्याचे सांगितले आणि तिला महागडा मोबाईल फोन भेट म्हणून पाठवण्याचे आश्वासन दिले.
यानंतर तिला दुसऱ्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला सीमाशुल्क अधिकारी असल्याचे भासवून सांगितले की, दिल्ली विमानतळावर तिच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे ती तस्करी आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेली असल्याचा आरोप करण्यात आला.
त्यानंतर आणखी एका संशयिताने स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख दिली. त्याने तिला बनावट एफआयआरची प्रत पाठवून आरोपी म्हणून नाव दाखवले आणि अटक करण्याची धमकी दिली. या प्रकरणातून सुटका करून देण्यासाठी कस्टम ड्युटी आणि कोर्ट शुल्काच्या नावाखाली पैसे भरण्याची मागणी करण्यात आली.
भीतीपोटी पीडितेने स्वतःचे दागिने विकले आणि बचत रक्कम काढून आरोपींच्या खात्यावर पैसे हस्तांतरित केले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.












