सावंतवाडी पत्रकार संघ व अर्चना फाउंडेशनतर्फे सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘अतिथी देवो भव’ ही कोकणची संस्कृती आहे. त्यामुळे अतिथी म्हणून आपल्या जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांना संकटाच्यावेळी देवदूत बनत या युवकांनी त्यांना जीवनदान देऊन आपली संस्कृती जपली आहे. खरतरं शासनाने त्यांची दखल घेणं गरजेचं होतं. परंतू, बाळशास्त्रींचा आदर्श ठेवून कार्यरत असणारे पत्रकार त्यांच्या मागे उभे राहीले. त्या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अशा कोकणातील त्या युवकांचा व त्यांचा सन्मान करणाऱ्या पत्रकारांचा आम्हाला अभिमान आहे, असे गौरवोद्गार अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी काढले.
मागील आठवड्यात अतिवृष्टीच्यावेळी बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना स्वतःच्या जीवाची बाजी लावत सुखरूप बाहेर काढणाऱ्या सरमळेतील ‘त्या ‘ सात युवकांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरमळे आमराई येथे सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे, रजत देसाई, अक्षय तळवडेकर (सर्व सरमळे), एकनाथ दळवी (विलवडे),संजय गावकर (ओटवणे) यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यात काही पर्यटक अडकले होते. याबाबतची माहिती मिळताच या युवकांनी पुराच्या पाण्यात धाडस दाखवत उतरून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तसेच जेसीबीच्या सहाय्याने त्यांची वाहने देखील पुरातून बाहेर काढली. त्यांच्या या कर्तुत्वाचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी कार्यक्रमाच स्वरूप मांडलं. यावेळी धाडसी युवकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्या प्रसंगाचा थरार कथन केला. तालुका पत्रकार संघाच्यावतीने फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आमच्या गावच्या ७ धाडसी युवकांमुळे सात जणांचे जीव वाचले. पत्रकार संघ तसेच अर्चना फाउंडेशनने त्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर थाप मारली. शासनाने दखल घेतली नाही त्यांना आता जाग येईल. त्यांची दखल शासन घेईल असं मत उपसरपंच दिपांकर गावडे यांनी व्यक्त केल.
अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक म्हणाले, निधड्या छातीच्या तरुणांच्या सन्मानाचा कार्यक्रम हा नेहमी मोठाच असतो. संकटं काळात जो धावून येतो तो देवदूत असतो. गेल्या काही वर्षांत कोकणात मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण होत आहेत. अशी परिस्थिती कोकणात या आधी नव्हती. त्यामुळे अशा आपत्तीच्या प्रसंगी जे लोक मदत करतात त्यांचा गौरव होणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक गावात अशी लोक असतात. अशा लोकांची निवड करुन आपत्ती व्यवस्थापन कक्षात त्यांना सामावून घेतलं पाहिजे. त्यांना प्रशिक्षण देऊन साधन सामुग्री उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी पत्रकार संघ म्हणून आम्ही प्रयत्न करू, असं मत नाईक यांनी व्यक्त केल.
याप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, माजी उपसरपंच समीर माधव, ग्रामपंचायत सदस्य राजन कांबळे, एकता दळवी, नाना काटाळे, भजनी बुवा संजय गावडे, विजय गावडे, अजित दळवी, पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर, उपाध्यक्ष दीपक गांवकर, सहसचिव विनायक गांवस, सदस्य राजू तावडे, मंगल कमत, नरेंद्र देशपांडे, मोहन जाधव, सचिन रेडकर,रूपेश हिराप, निलेश परब, शैलेश मयेकर, आनंद धोंड, साबाजी परब, रामदास पारकर, भुवन नाईक, अर्चना फाउंडेशनचे वैभव परब, प्रवीण परब, आकाश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पत्रकार लुमा जाधव यांनी व्यक्त केले.












