हत्तींना हटवा, अन्यथा वनविभागाच्या दारातच ‘ठाण’ मांडू

कोलझर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा एल्गार : वनविभागाच्या भूमिकेवर तीव्र संताप

सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकणच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या काजू हंगामावर यंदा हत्तींच्या संकटाने भीषण सावट निर्माण केले आहे. त्यामुळे बागेत हत्तींनी ठाण मांडल्याने आमचे हक्काचे उत्पन्न झाडाखाली सडून जात आहे. अशा परिस्थितीत आम्ही वर्षभर प्रपंच कसा चालवायचा? असा संतप्त सवाल करत कोलझर, तळकट आणि शिरवल पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली. येत्या चार दिवसांत हत्तींचा कायमचा बंदोबस्त न झाल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोरच बेमुदत उपोषण करण्याचा निर्वाणीचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.

सध्या दक्षिण कोकणात काजू गोळा करण्याचा हंगाम ऐन भरात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हत्तींच्या कळपाने कोलझर परिसरात मुक्काम ठोकल्याने बागायतदार पुरते हतबल झाले आहेत. या भागातील बहुतांश काजू बागा डोंगराळ भागात असून, तिथेच हत्तींचा वावर असल्याने शेतकरी बागेत पाऊल ठेवण्यासही धजावत नाहीत. हत्तींच्या दहशतीमुळे हाताशी आलेले पीक वाया जात असून, यामुळे निर्माण झालेली संतापाची लाट आज वनविभागाच्या कार्यालयात पाहायला मिळाली. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा मुख्यालयी नसल्याने सहायक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली, मात्र यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाच्या आजवरच्या ढिम्म कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.

यावेळी ग्रामस्थांनी गेल्या वर्षीच्या कटू आठवणींना उजाळा देत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. गेल्या वर्षी याच हंगामात जेव्हा हत्तींचा कळप या भागात दाखल झाला होता, तेव्हा हत्तींच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी ‘वनतारा’ प्राणी संग्रहालयाचे तज्ज्ञ आले असल्याचे कारण पुढे करत वनविभागाने हत्तींना या भागात राहू देण्याची अजब भूमिका घेतली होती. या प्रयोगामुळे हत्ती या भागात दीर्घकाळ स्थिरावले आणि त्यांनी नारळ, सुपारी व काजू बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. वनविभागाने ‘वनतारा’च्या नावाने रचलेला हा खेळ केवळ प्रशासकीय प्रयोग नसून तो थेट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा ठरला, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

सद्यस्थिती मांडताना शेतकरी म्हणाले की, आता पुन्हा यंदाच्या हंगामात हत्तींनी नुकसानीचे सत्र सुरू केले आहे. काजू हे या भागातील शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. पुढचा संपूर्ण महिना हा उत्पन्नाचा काळ असताना हत्तींमुळे बागेत जाता येत नसेल, तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. हत्ती आता मानवी वस्तीजवळील बागांमध्ये येऊ लागले आहेत, ज्यामुळे भविष्यातील धोका अधिक वाढला आहे. नाइलाजास्तव पोटासाठी शेतकरी जिवावर उदार होऊन बागेत जातील आणि अशा वेळी जर कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला पूर्णपणे सावंतवाडी वनविभाग जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या संकटातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी हत्तींना तातडीने हटवण्यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन वनविभागाला देण्यात आले. यामध्ये गस्त प्रभावी करण्यासाठी किमान दोन अतिरिक्त ड्रोन उपलब्ध करून देणे, हत्ती प्रतिबंधक पथकाला आधुनिक साधनसामग्री पुरवणे, आणि हत्तींचा शिरकाव कायमचा रोखण्यासाठी ‘केर’ ते ‘कोलझर’ या मार्गावर ठिकठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे हँगिंग कुंपण तातडीने उभारणे अशा मागण्यांचा समावेश आहे. तसेच हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एक वेगळी आणि कार्यक्षम यंत्रणा उभी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळेल, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

ग्रामस्थांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन सहायक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. हत्तींना या भागातून हटवण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू केली जाईल, तसेच पुढील १० दिवसांत काजू नुकसानीचा पंचनामा करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या चर्चेत पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, सरपंच सुजल गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शामराव देसाई, ज्येष्ठ ग्रामस्थ आपा देसाई यांच्यासह महादेव देसाई, रोहन देसाई, दिलीप देसाई, अमर सावंत, विलास देसाई, उल्हास देसाई, सूर्यकांत गवस, अजित दळवी, तातोबा देसाई व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.