सावंतवाडीत २८ रोजी भाजपचे ‘बुथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन ‘

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे ‘बुथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन ‘ आरपीडी मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या सर्व कार्यकारणीचे तब्बल ४ हजार कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहीती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकार सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, नुकतीच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकण्यात आले, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. काही झाले तरी आम्ही कमळ या चिन्हावरच लोकसभा लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, अमित परब, राजन राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले, लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आता अंतिम टप्यातील तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत २८ तारीखला येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात बुथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन होणार आहे. यावेळी सर्व शक्तीकेंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स, सातही मोर्चाचे प्रमुख, संघटनात्मक पदाधिकारी असे मिळून तब्बल ४ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकसभा लढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या मेळाव्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील, अतुल काळसेकर, विक्रम पाटील आणि प्रमोद जठार यांच्याकडे देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. मावळ, रायगड आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा तीन लोकसभा मतदार संघात सुद्धा संमेलन घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्या दृष्टीने फायदा होणार आहे.

या संमेलनाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत संबोधित करणार आहेत. ते २७ व २८ या दोन्ही दिवसात मावळ ते सिंधुदुर्ग असा दौरा करणार आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळांना भेटीगाठी मोर्चा आघाडी मेळावा असे अन्य सात ते आठ विविध कार्यक्रम ते घेणार आहेत. सावंतवाडीत होणाऱ्या कार्यक्रमाची जबाबदारी संजू परब यांच्यासह महेश सारंग मनोज नाईक आदी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नारायण राणेंच्या नावानेच घाबरून
विनायक राऊतांची बेताल बडबड

नारायण राणे लोकसभा लढविणार हे ऐकूनच खासदार विनायक राऊत घाबरले आहेत. ते राणे यांच्या विरोधात काहीही विधाने करीत आहेत, मुळात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आमची मोठी ताकद आहे. परतू राऊत दोन आमदारांच्या जीवावर कसे निवडून येणार ही विचार करणारी गोष्ट आहे. वरिष्ठ पातळीवर लोकसभेचा उमेदवार निश्चित झाला की महायुतीच्यावतीने या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत मात्र कमळ चिन्हावर ही लोकसभा लढवावी ही आमच्या कार्यकर्त्याची मागणी आहे, असेही प्रभाकर सावंत म्हणाले.