हँड ब्रेक न लावल्याने अपघात : मोठी वाहतूक कोंडी
सावंतवाडी | प्रतिनिधी :
शहरातील वर्दळीच्या चिटणीस नाका परिसरात आज सकाळी एक विचित्र अपघात घडला. पार्किंगमध्ये उभी केलेली स्विफ्ट कार अचानक न्यूट्रल होऊन उतारावरून धावत गेली आणि समोर उभ्या असलेल्या एसटी बसला धडकली. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला असून, बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका कार चालकाने आपली स्विफ्ट कार (Swift) चिटणीस नाका परिसरातील उतारावर पार्क केली होती. कार उभी करून चालक आपल्या कामासाठी निघून गेला. मात्र, काही वेळाने ही कार अचानक न्यूट्रल झाली आणि उतारावरून वेगाने पुढे सरकू लागली. याच वेळी समोर प्रवासी उतरवण्यासाठी एक एसटी बस उभी होती. ही कार थेट जाऊन एसटी बसवर आदळली.
वाहतुकीचा खोळंबा आणि पोलिसांची कारवाई
या धडकेत कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे दोन्ही वाहने रस्त्यातच अडकल्याने चिटणीस नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, अपघात होऊन बराच वेळ झाला तरी कार मालक घटनास्थळी हजर नव्हता, त्यामुळे ही कोंडी अधिकच जटील बनली.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. कार चालकाची प्रतीक्षा न करता, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार ढकलून बाजूला केली आणि रस्ता मोकळा केला.
आपापसात तडजोड
अपघाताच्या बराच वेळानंतर कार चालक घटनास्थळी पोहोचला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. एसटी प्रशासन आणि कार चालक यांनी हा प्रकार आपापसात सामोपचाराने मिटवल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, उतारावर गाडी पार्क करताना हँडब्रेक किंवा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, याचीच चर्चा परिसरात सुरू होती.













