निवसर बौद्धवाडी येथून मोटरसायकल चोरीला

अज्ञात चोरट्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील निवसर बौद्धवाडी येथे उभी करून ठेवलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० ते १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची तक्रार विकास सखाराम कांबळे (वय ४०,राहणार निवसर बौद्धवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. विकास कांबळे यांनी आपल्या ताब्यातील काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल (क्रमांक एम.एच.०८ बीएफ २९३२) ही दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कामावरून घरी आल्यानंतर रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्याने ही मोटर सायकल वाडीतील नालंदा बौद्ध विहाराजवळ उभी करून ठेवली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ही मोटरसायकल त्या जागेवरून चोरून नेली.‌

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विकास कांबळे यांना आपली मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात झाले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात मोटरसायकलचा शोध घेतला त्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जान्हवी मांजरे या करीत आहेत.